महान अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दर वर्षी १५ सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स’च्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान प्रगतशील समिती : केट (आयईआय)चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गिरीश श्रीकिसन मुंदडा यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.

दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स संस्थेचा इतिहास काय आहे ?

– या संस्थेची स्थापना १९२० मध्ये झाली. त्यानंतर ९ सप्टेंबर १९३५ ला संस्थेचा ‘रॉयल चार्टर’अंतर्गत समावेश करण्यात आला. या चार्टरद्वारे अभियंत्यांमध्ये अभियांत्रिकी क्षेत्राची सर्वांगीण प्रगती घडवून आणण्याची जबाबदारी संस्थेला देण्यात आली. स्वातंत्र्यानंतर संस्थेला ‘बॉडी कॉर्पोरेट’ म्हणजे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त झाले. त्यामुळे शतकभराहून अधिक काळ ही संस्था आपल्या देशातील अभियंत्यांची एक प्रमुख, बहुविषयक संस्था म्हणून कार्यरत आहे. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेने अभियांत्रिकी व्यवसायाचा विकास, अभियंत्यांचे व्यावसायिक कौशल्य, तांत्रिक ज्ञान, संशोधन आणि समाजोपयोगी अभियांत्रिकी यांना चालना देण्याचे काम केले. संस्थेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. संस्थेची केंद्रे भारतभर असून, हैदराबाद येथे ‘इंजिनीअरिंग स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया’ हे महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र आहे. संस्थेच्या केंद्रांमार्फत अभियंत्यांसाठी तांत्रिक व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, औद्योगिक चर्चा, संशोधनविषयक कार्यक्रम राबविले जातात. याशिवाय ‘आईआय-स्प्रिंगर’ (स्कोपस इंडेक्स) तांत्रिक संशोधनांचे प्रकाशनही करण्यात येते. याद्वारे नवीन संशोधन, तांत्रिक लेख आणि अभियांत्रिकीतील घडामोडी अभियंत्यांपर्यंत पोहोचतात.

उत्तम अभियंता आपल्या देशासाठी काय करू शकतो?

– अभियंता देशाच्या विकासासाठी तंत्रज्ञान व नवकल्पनांचा प्रभावी वापर जसा करू शकतो, तसेच देशाच्या जडणघडणीत पायाभूत सुविधा, उद्योग-व्यवसायात वृद्धी, शाश्वत विकास साधू शकतो. अभियांत्रिकीच्या ज्ञानामुळे समाजाच्या दैनंदिन समस्यांवर व्यवहार्य उपाय निघू शकतो. तसेच, सुरक्षित, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करण्याचे कसब अभियंत्याकडे असते. तो कोणत्याही क्षेत्रातील असला, तरी त्याची प्रत्येक क्षेत्राला गरज आहेच.

संस्थेची प्रमुख उद्दिष्टे कोणती आहेत?

– देशातील अभियांत्रिकी व्यवसायाचा सर्वांगीण विकास करणे, अभियंत्यांचे तांत्रिक व व्यावसायिक ज्ञान अद्ययावत ठेवणे, विविध अभियांत्रिकी शाखांतील अभियंत्यांना एकत्र आणणे, संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देणे, उद्योग, शिक्षणसंस्था, शासन आणि अभियंते यांच्यात तांत्रिक संवाद निर्माण करणे, अभियंत्यांच्या व्यावसायिक कौशल्याचा आणि नैतिक मूल्यांचा विकास करणे, देशाच्या औद्योगिक व सामाजिक विकासासाठी अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग करणे, भारतीय अभियंत्यांना राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे आदी संस्थेची उद्दिष्टे आहेत. संशोधन व विकासासाठी संस्था अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना आर्थिक मदत आणि सहायक अनुदान देते.

सदस्यत्व कसे घेता येते?

– प्रमुख कॉर्पोरेट सदस्यत्वामध्ये सहयोगी सदस्य, सदस्य, फेलो यांचा समावेश होतो. याशिवाय विद्यार्थी आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी स्वतंत्र श्रेणी आहे. बीई, बीटेक किंवा समकक्ष अभियांत्रिकी पात्रता असलेल्या व्यक्तींना पात्रतेनुसार सदस्यत्व घेता येऊ शकते. अभियांत्रिकी पदवीबरोबर आवश्यक व्यावसायिक अनुभव असलेल्या अभियंत्यांसाठीदेखील वेगळ्या प्रकारचे सदस्यत्व आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व संशोधन कार्यरत संस्थांनापण संस्थात्मक सदस्यत्व उपलब्ध आहे.

– अभियंत्यांसाठी संस्थेचा कसा उपयोग होऊ शकतो ?

अभियंत्यांना व्यावसायिक ओळख यामुळे मिळते, तसेच देशभरातील अभियंते, उद्योग, संशोधन आणि तज्ज्ञांशी संपर्क साधता येऊ शकतो. नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्यांशी परिचय होऊन करिअरच्या संधी वाढविण्यास मदत मिळू शकते. संशोधन व प्रकल्पांसाठी उपलब्ध योजनांचा लाभ अभियंत्यांना घेता येऊ शकतो. ही संस्था म्हणजे अभियंत्यांच्या संपूर्ण व्यावसायिक विकासासाठी कार्य करणारे राष्ट्रीय व्यासपीठ आहे. या संस्थेने अभियांत्रिकी शिक्षण, तांत्रिक ज्ञान, संशोधन, व्यावसायिक प्रमाणन, नेटवर्किंग आणि उद्योग-शिक्षण-शासन यांच्यातील संवाद यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

shriram.oak@expressindia.com