पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील शिपाई पदाच्या ४६२ जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू असून, १४ हजार ७७९ अर्ज आले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांत पदवी, पदव्युत्तर असलेले ५४२३ तरुण परीक्षा देत आहेत. त्यात वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर (एम. कॉम.) १३९, इंजिनीअरिंग झालेले १५६, एक वकील, दोन शिक्षक, तंत्रज्ञान विषयातील (एमटेक) पदव्युत्तर तीन उमेदवारांचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात शिपाईपदाच्या ४६२ जागांची भरती केली जात आहे. ११ फेब्रुवारीपासून भोसरीतील इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलातील मैदानावर प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू आहे. ५० गुणांची शारीरिक चाचणी आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक आणि १६०० मीटर धावणे आदी प्रकारांचा समावेश आहे. महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर, १०० मीटर धावणे आणि गोळाफेक चाचणी घेतली जात आहे.
मैदानी चाचणीसाठी आलेले बहुतांश तरुण उच्चशिक्षित असल्याचे दिसून आले. अर्जावरून माहिती घेतली असता बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग झालेले १५२, बीसीए १०७, ऑटोमोबाइल अभियंता एक, एमटेक तीन, बीएस्सी एक हजार सात, वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर (एमकॉम) असलेले १३९, बीकॉम झालेले ९६५, एमबीए ५९, कला शाखेत पदव्युत्तर झालेले २९४, एलएलबी झालेले एक, एमसीए २३, एमसीएस ११, व्यावसायिक पदव्युत्तर (एमएसडब्ल्यू) १८, एमएससी ९३, हॉटेल व्यवस्थापनाची पदवी घेतलेले एक, पत्रकारिता एक, शिक्षकी पेशामध्ये बीएबीएड एक, बीपीएड एक यांचा समावेश आहे. यासह वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्चशिक्षित तरुणदेखील शिपाईपदासाठी नशीब आजमावत असल्याचे समोर आले आहे. अर्ज केलेल्या उच्चशिक्षित उमेदवारांवरून वाढत्या बेरोजगारीचे वास्तव समोर आले आहे. पहाटे चार वाजल्यापासून या ठिकाणी भरतीसाठी तरुण गर्दी करीत आहेत.
अशी होते शारीरिक चाचणी
मुख्य प्रवेशद्वारावर बारकोड स्कॅनरने हजेरी घेतली जाते. या हजेरीपत्रकावर छायाचित्र व स्वाक्षरी घेतली जाते. त्यानंतर उंची व छाती यांचे मोजमाप होते. कागदपत्र तपासासाठी सभागृहात पाठविण्यात येते. तिथेही पात्र झालेल्या उमेदवारांची यादी तयार करून आरएफआयडी टॅग व चेस्ट क्रमांकाचे वाटप केले जाते. त्यानंतर मुख्य मैदानात १०० मीटर धावणे, गोळाफेक, १६०० मीटर धावणे याची चाचणी घेतली जाते. वरीलपैकी एकाही चाचणीत अपात्र ठरल्यास त्यास अपात्र टेबलकडे पाठविण्यात येते.
वकील – १
इंजिनीअर – १५६
एमकॉम – १३९
बीकॉम – ९६५
शिक्षक – २
एमबीए – ५९
एमसीए – २३
बीबीए – ४०
हॉटेल व्यवस्थापन – १
औषधनिर्माण शास्त्र – ४०
बीएस्सी – १००७
पोलीस भरतीसाठी १४ हजार ७७९ अर्ज आले आहेत. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत पदवी, पदव्युत्तर असलेले ५४२३ तरुण परीक्षा देत आहेत. पारदर्शक पद्धतीने भरतीप्रक्रिया सुरू असून, उमेदवारांच्या सुरक्षेसाठी एक अधिकारी आणि तीन अंमलदार नेमण्यात आले आहेत, असे पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी सांगितले.

