पुणे : ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात इंग्रजी येत नाही, हा न्यूनगंड आता कालबाह्य झाला आहे. जागतिक स्तरावरील बाजारपेठेत मराठीतून व्यवहार करणे शक्य झाले असून, मराठी भाषा जागतिक स्तरावरच्या ज्ञानाशी कशी जोडली जाईल, यासाठी भविष्यात प्रयत्न करावे लागतील,’ असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांनी व्यक्त केले.

‘आम्ही नूमवीय’च्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ व्यावसायिक विठ्ठल मणियार आणि उद्योजक श्रीकृष्ण चितळे यांना ‘नूमवि जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. श्रीकांत धोंगडे, डॉ. संप्रसाद विनोद, मिलिंद गुंजाळ, अनिल गोडे आणि डॉ. संजीव अभ्यंकर यांना ‘नूमविरत्न पुरस्कार’, सुहास जोशी, हरी आगाशे, सतीश कामत, जितेंद्र जाधव, आशिष कुलकर्णी आणि जितेंद्र भुरुक यांना ‘नूमविभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘

नूमवि गुरुवर्य’ पुरस्कार रमेश परचुरे आणि वि. ह. भालेराव यांना देण्यात आला, तर उदयोन्मुख पुरस्कार पवन वाघुळकर यांना देण्यात आला. शाळेत प्रथम आलेल्या यश सचिन बिडकर या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. ‘आम्ही नूमवीय’चे अध्यक्ष अजित रावेतकर, कार्याध्यक्ष किशोर लोहोकरे, सचिव मिलिंद शालगर, सहकार्यवाह अभिषेक पापळ, उपाध्यक्ष मोहन उचगावकर, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.‘राष्ट्राचे संरक्षण आणि पायाभरणी शाळेतून होत असते. त्य़ासाठी शाळा प्रगत हव्यात. अशा शाळांमध्ये केवळ साक्षरता शिकवली जात नाही, तर जीवनाची सार्थकता, सधनता शिकवली जाते,’ असे सावंत म्हणाले.

‘घरातून आणि गुरुजनांकडून मिळालेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन आय़ुष्याला सुरुवात केली. कुठल्याही बंधनात न अडकता एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जे काही काम करता येईल ते करावे, याच भावनेतून आयुष्याची वाटचाल केली. समाजासाठी जे केले त्यामध्ये मला आनंद मिळत गेला. हा आनंदच मला काम करण्याची स्फूर्ती देत आहे,’ असे मणियार यांनी सांगितले.

‘या पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी पेलण्याची ताकद मिळावी,’ असे चितळे म्हणाले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.