पिंपरी : सुंदर हस्ताक्षरामुळे स्वतंत्र ओळख असलेले पिंपरी गावातील वयोवृद्ध संतसेवक बाळासाहेब महादू वाघेरे यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली आहे. देहूला भंडारा डोंगरावर बसून तुकाराम गाथाही हाताने लिहून काढण्याचा संकल्पही वाघेरे यांनी केला आहे.

वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असलेले ७३ वर्षीय संतसेवक बाळासाहेब वाघेरे यांचे लहानपणापासूनच वळणदार व सुंदर हस्ताक्षर आहे. २ डिसेंबर २०२१ रोजी ज्ञानेश्वरी लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली. या उपक्रमासाठी त्यांना १२०० पाने लागली. त्यांच्या या कामगिरीबद्दल पैलवान चंद्रकांत सातकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. वाघेरे परिवाराच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. माजी महापौर संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, पै. संभाजी राक्षे, पै. विजय नखाते, सतीश महाराज गव्हाणे, शारदा मुंढे उपस्थित होते. उद्योजक हनुमंत वाघेरे हे कार्यक्रमाचे आयोजक होते.