पिंपरी : देहू रोड ते चांदणी चौक दरम्यानच्या विविध रस्त्यांवर सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गुरुवारपासून (१ सप्टेंबर) याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार आहे. ३० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत हे बंदी आदेश लागू राहणार आहेत.
पिंपरी पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाचे उप आयुक्त आनंद भोईटे यांनी या बाबतची माहिती दिली.

सूस रस्ता-खिंड पाषाणमार्गे तसेच विद्यापीठ चौकातून राष्ट्रीय महामार्ग ४ वरील चांदणी चौक, कोथरूड, कात्रज तसेच सातारा भूगाव रस्त्यावर येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी असेल. तसेच, भूगाव मुळशी रस्त्याकडून आणि देहू रोड-किवळे येथून चांदणी चौक, कोथरूड, सातारा रस्त्यावर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. एनडीए रस्त्याकडून चांदणी चौकमार्गे सातारा बाजूकडे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी असणार आहे, असे भोईटे यांनी सांगितले.

हेही वाचा : Ganesh Utsav 2022 : गणेशोत्सवासाठी पीएमपीच्या जादा गाड्या

चांदणी चौक, सूस रस्ता आदी परिसरात रस्तेविकासाची बरीच कामे सुरू आहेत. येथील रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अपुरे पडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघातांची संख्या वाढते आहे. बहुतांश अपघात जड वाहनांमुळे घडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन येत्या काळासाठी काही प्रमाणात वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत. हे बदल ३० सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील, असे भोईटे यांनी सांगितले.