पुणे : लोहगाव येथील हवाई दलाच्या तळाच्या आवारात बेकायदा प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्याोका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हवाई दलाच्या तळात प्रवेश करताना भिंतीवर चढलेला तरुण पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली.

याबाबत हवाई दलातील कनिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार सिंह (वय ४७) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका पंचवीस वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील टाटा गार्ड रुम परिसरात हवाई दलाची जागा आहे. लोहगाव येथील हवाई दलाच्या तळाचा हा भाग असून, हवाई दलातील अधिकारी, कर्मचारी वगळता अन्य नागरिकांना या भागात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास तरुण टाटा गार्ड रुम परिसरातील भिंतीवर चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. त्या वेळी गस्त घालणाऱ्या हवाई दलातील कर्मचाऱ्यांनी तरुणाला पाहिले. तरुणाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

भितींवर चढून प्रवेश करण्याच्या प्रयत्नात तरुण पडल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याला हवाई दलाच्या रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले. हवाई दलाच्या तळाच्या आवारातील अंतर्गत भागाची उत्सुकतेपोटी माहिती घेण्यासाठी भिंतीवर चढून प्रवेश करणार होता, असे तरुणाने हवाई दलातील अधिकाऱ्यांना सांगितले. भारतीय न्यायसंहिता कलम ३२९ (३) अन्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पंधरा दिवसांपूर्वी हवाई दलाच्या जागेत बेकायदा प्रवेश करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अल्पवयीनांकडून एकावर शस्त्राने वार

वादातून अल्पवयीनांकडून एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना धायरी भागात घडली. या प्रकरणी चार अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत राजू विनोद शहा (वय १८, रा. पोकळे क्रिस्टल बिल्डिंग, भैरवनाथ मंदिराजवळ, धायरी) याने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा याच्या भावाशी अल्पवयीनांशी वाद झाला होता. २३ जानेवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शहा याचा भाऊ धायरीतील भैरवनाथ मंदिराजवळ थांबला होता. त्या वेळी अल्पवयीनांनी शहा याच्या भावावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत शहा याचा भाऊ गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या चौघा अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दुखापत केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.