पुणे : कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीविरुद्ध एक हजार ८८६ पानाांचे आरोपपत्र आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सादर करण्यात आले. ‘या प्रकरणात अन्य आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येईल’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

कोरेगाव पार्क (मुंढवा ) जमीन गैरव्यवहार तेजवानी मुख्य आरोपी आहे. पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनी, तसेच संचालक दि्ग्विजय पाटील, शीतल तेजवानी, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले. हेमंत गवंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार तेजवानीविरुद्ध पुरावे गोळा करण्यात आले. त्याअनुषंगाने पोलिसांनी जबाब नोंदविले. दरम्यान, या प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्यसह अन्य आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येईल’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अजय वाघमारे आणि पथकाने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात यापूर्वी दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, हेमंत गवंडे यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. गवंडे चौकशीसाठी उपस्थित राहिले होते. या प्रकरणात तेजवानीची पोलिसांनी सलग दोन दिवस चौकशी केली. तेजवानीने दिलेल्या जबाबाचे अवलोकन करण्यात आले. याप्रकरणात विविश शासकीय विभागांकडून कागदपत्रे मागविण्यात आली. या कागदपत्रांची केल्यानंतर गैरव्यवहार प्रकरणात तेजवानी सामील असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिला करण्यात आली.

‘अमेडिया’कंपनीने कोरेगाव पार्क भागातील ४० एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, बोपोडीतील जमीन प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शीतल तेजवानी आणि ‘अमेडिया’कंपनीचा संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. कोरेगाव पार्क जमीन प्रकरणात तेजवानींचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. कोरेगाव पार्क (मुंढवा) जमीन प्रकरणात २७५ वारसदार आहे. ही जमीन कुलमुख्यारपत्र करुन शीतल तेजवानी यांना संबंधित व्यक्तींनी दिली होती.