पुणे : ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी (ईपीएफ) कामगारांची वेतनमर्यादा १५ हजारांवरून २५ हजार रुपये प्रस्तावित आहे. यामुळे २५ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन असलेल्या कामगारांना ‘ईपीएफ’ बंधनकारक ठरणार असून, या निधीचा लाभ मिळणाऱ्या कामगारांच्या संख्येत वाढ होणार आहे. जास्तीतजास्त कामगारांना सामाजिक संरक्षण मिळवून देणारे हे पाऊल आहे,’ असा सूर चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) आकुर्डीतील प्रादेशिक कार्यालय आणि फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण औद्योगिक क्षेत्रातील टेट्रा पॅक इंडिया येथे जनजागृती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कर्मचारी आणि औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

सामाजिक सुरक्षेशी संबंधित अलीकडील घडामोडी आणि महत्त्वाच्या उपक्रमांवर या चर्चासत्रात भर देण्यात आला. यामध्ये ईपीएफची वेतनमर्यादा दरमहा १५ हजारांवरून २५ रुपये करण्याचा प्रस्तावित निर्णय, रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना, पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना आणि सामाजिक सुरक्षा संहितेतील संबंधित तरतुदी यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमात प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त सनत कुमार आकुर्डी यांनी वेतनमर्यादेत वाढ करण्याच्या प्रस्तावित निर्णयाचे महत्त्व विशद केले. सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवणे आणि अधिकाधिक कामगारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेच्या कक्षेत आणणे, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी ‘ईपीएफओ’च्या अधिकाऱ्यांनी ‘ईपीएफ’ वेतनाची गणना आणि इलेक्ट्रॉनिक चलन-कम-विवरणपत्र तयार करण्याबाबत थेट प्रात्यक्षिकही सादर केले. या प्रात्यक्षिकामुळे उद्योजक आणि त्यांच्या प्रतिनिधींना ही प्रक्रिया समजण्यास मदत झाली. ‘फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज’चे मुख्याधिकारी दिलीप बटवाल आणि विनोद जैन यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. बटवाल यांनी पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी होत असलेल्या फेडरेशनच्या कामांची माहिती दिली.