चित्रपट हे माझ्यासाठी साहित्यापेक्षाही आवडीचे माध्यम आहे. महात्मा गांधी यांनी आयुष्यभर अहिंसेचे मूल्य जोपासले. मात्र, ब्रिटिश साम्राज्याची मोडतोड केली. आतून प्रचंड खळबळ आणि बाहेरुन कमालीचे शांत असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हा विरोधाभास ज्या दिग्दर्शकाला समजेल तोच त्यांच्यावरील चित्रपटाला न्याय देऊ शकेल. गांधीजींवरील चित्रपटांचे अनेक उत्तम प्रयत्न झाले तरी त्यांच्या आयुष्यावरील एपिक म्हणावा अशा चित्रपटाची अद्याप अद्याप प्रतीक्षाच आहे, असे मत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रविवारी व्यक्त केले.
हेही वाचा >>> पुणे: बीबीसी निर्मित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपटाचे ‘एफटीआयआय’मध्ये प्रदर्शन
सनदी अधिकारी आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक प्रकाश मगदूम लिखित ‘द महात्मा ऑन सेल्यूलॉईड’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी नेमाडे बोलत होते. सतीश जकातदार, प्रकाश मगदूम, गिरीश कुलकर्णी, अभिजीत रणदिवे आणि संग्राम गायकवाड उपस्थित होते.
हेही वाचा >>> विश्लेषण : महात्मा गांधींना आजपर्यंत नोबेल पुरस्काराने सन्मानित का करण्यात आलं नाही? काय सांगतो इतिहास?
प्रभावळकर म्हणाले, गांधी साकारायला मिळणे ही माझ्यासाठी जबाबदारीची, मानाची, आव्हानात्मक आणि अभिमानाची संधी ठरली. त्यांची मूल्ये ही नेहमीच जगाला आणि मानवतेला तारणारी आहेत. नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग, लॉर्ड माऊंटबॅटन, आयसेनहॉवर, चार्ली चॅप्लिन ते आईनस्टाईन असे अनेक जण गांधी विचाराने प्रेरित झाले. आईनस्टाईनने गांधी यांचे वर्णन सर्वकालीन महान व्यक्तिमत्त्व (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम) असे केले, ते का याचा पुरावा म्हणजे प्रकाश मगदूम यांचे हे पुस्तक आहे.
आज समाज केवळ पुढे-मागे करतो आहे, पुढे जात मात्र नाही, अशा वेळी गांधींवर पुस्तक लिहिणे हा एक प्रकारचा औचित्यभंग असताना असे पुस्तक लिहिल्याबद्दल कुलकर्णी यांनी मगदूम यांचे अभिनंदन केले.