पुणे : क्ष-किरण प्रकाशात अधिक सखोल वेध घेणाऱ्या ‘ई-रोझिटा’ या नव्या दुर्बिणीच्या साहाय्याने जवळपास २० लाख क्ष-किरण स्रोतांची नोंद झाली आहे. त्यातून मॅजेलॅनिक ब्रिज नावाच्या दोन लघुदीर्घिकांना जोडणाऱ्या एका प्रदेशात प्रथमच एका तारकीय प्रणालीचा शोध लागला आहे.
आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोल भौतिकी केंद्राने (आयुका) याबाबतची माहिती दिली. या संशोधनात डॉ. तथागत साहा, प्रा. चान्द्रेयी मैत्रा यांचा सहभाग होता. सामान्य प्रकाशात दिसून न येणाऱ्या विश्वातील अत्यंत उष्ण, ऊर्जावान आणि तीव्र प्रक्रियांचा अभ्यास खगोलीय क्ष-किरण निरीक्षणांमुळे करता येतो.
क्ष-किरण प्रकाशात अधिक सखोल वेध घेणारी ई-रोझिटा (एक्स्टेण्डेट रोएंटजेन सर्व्हे विथ ॲन इमेजिंग टेलिस्कोप ॲरे) ही क्ष-किरण दुर्बीण स्पेक्ट्रम रोएंटजेन गॅमा अवकाशयानावर बसवलेली आहे. जुलै २०१९मध्ये प्रक्षेपित झालेल्या या दुर्बिणीच्या आकाशव्यापी सर्वेक्षणातून मिळणारा हा विदासंच विश्वातील क्ष-किरण स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांना आता उपलब्ध होत आहे. या विदासंचाचा वापर करून आयुकातील शास्त्रज्ञांनी संशोधन केले.
ई-रोझिटाच्या निरीक्षणांतून ईआरएएसएसयू जे०४३११.८-७११७३० या स्रोताचा शोध लागला. त्याबाबतचे सखोल संशोधन डॉ. तथागत साहा आणि डॉ. चान्द्रेयी मैत्रा यांनी केले. विशेषतः कृष्णविवरे, न्यूट्रॉन तारे आणि पांढरे बटू तारे यांच्या भोवताली घडणाऱ्या प्रक्रियांविषयी क्ष-किरणे महत्त्वाची माहिती देतात. जे०४३११.८-७११७३० ही प्रणाली पांढरा बटू तारा आणि त्याच्याभोवती असलेल्या एका लाल महाकाय ताऱ्याची युगल प्रणाली आहे. त्यातील लाल महाकाय तारा सुमारे ५०० दिवसांच्या चक्रात आकुंचन-पसरण पावत असताना त्यातील काही वायू पांढऱ्या बटू ताऱ्याकडे ओढला जातो. या प्रक्रियेतून क्ष-किरण उत्सर्जन निर्माण होते. अशा प्रकारच्या प्रणालीला सिम्बायोटिक ॲक्स्रेटिंग सिस्टीम म्हटले जाते, अशी माहिती ‘आयुका’ने दिली.
दुर्बिणीद्वारे आकाशव्यापी सर्वेक्षण
दुर्बिणीद्वारे मिळालेल्या विदासंचामध्ये तीन आकाशव्यापी सर्वेक्षणांचा समावेश आहे. या सर्वेक्षणांसाठी ५५६ दिवस लागले. १९ लाखांहून अधिक बिंदूसदृश क्ष-किरण स्रोत, दीर्घिका समूह आणि सुपरनोव्हा अवशेषांसारखे सुमारे ६४ हजार विस्तारित स्रोत असा वैविध्यपूर्ण विदासाठा उपलब्ध झाला आहे. या सर्वेक्षणामुळे ‘मॅजेलॅनिक ब्रिज’ या प्रदेशाचा विशेष सखोल अभ्यास शक्य झाला. हा प्रदेश आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेल्या लार्ज मॅजेलॅनिक क्लाउड आणि स्मॉल मॅजेलॅनिक क्लाउड या दोन लघु आकाशगंगांदरम्यान आहे. त्यांच्या गुरुत्वीय संवादातून निर्माण झालेला हा प्रदेश दीर्घिकांच्या परस्परसंवादाचा ताऱ्यांच्या निर्मितीवर आणि उत्क्रांतीवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. लाल महाकाय ताऱ्याकडून पदार्थ मिळविणारी ही दुर्मीळ तारकीय प्रणाली मॅजेलॅनिक ब्रिजमध्ये प्रथमच आढळली आहे. ई-रोझिटाच्या अत्यंत संवेदनशील आणि या प्रदेशाच्या सातत्यपूर्ण निरीक्षणांमुळे संशोधन शक्य झाले.
या शोधामुळे परस्परसंवाद करणाऱ्या दीर्घिकांतील ताऱ्यांची उत्क्रांती काळानुसार कशी घडते, याचा अभ्यास करण्यासाठी नवी संधी उपलब्ध झाली आहे. तसेच, या प्रणालींचा अभ्यास करून आकाशगंगांच्या परस्परसंवादाच्या वातावरणात पांढरे बटू तारे, इतर वस्तू कशा निर्माण आणि उत्क्रांत होतात, हे पुढील काळात समजून घेता येईल. – डॉ. तथागत साहा, प्रा. चान्द्रेयी मैत्रा
