पुणे : वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांनी केलेल्या नोंदणीमध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. नोंदणी केलेल्या ९४ हजार शिक्षकांपैकी काही शिक्षकांनी एकच ई-मेल पत्ता एकापेक्षा जास्त वेळा वापरल्याचे, तर काही शिक्षकांचे ई-मेल पत्ते अवैध असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने स्पष्ट केले. आहे. संबंधित शिक्षकांना त्यांचे अद्ययावत ई-मेल पत्ते नोंदवण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेतले जाणार आहे. यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी शिक्षकांना नोंदणी करण्यास सांगण्यात आले होते. एससीईआरटीने केलेल्या विश्लेषणातून नोंदणी केलेल्या ९४ हजार शिक्षकांपैकी १ हजार ५५० शिक्षकांचे ई-मेल पत्ते अवैध असल्याचे, तर १ हजार ८१ शिक्षकांचे ई-मेल पत्ते दुबार, म्हणजे एकच ई-मेल पत्ता एकापेक्षा जास्त वेळा वापरण्यात आल्याचे आढळून आले. संबंधित शिक्षकांची यादी एससीईआरटीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तसेच शिक्षकांना प्रशिक्षण गट, प्रशिक्षण प्रकार, दुहेरी नोंदणी, ई-मेल पत्ता बदलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांला ई-मेल पत्ता हाच ‘लॉगीन आयडी’ म्हणून दिला जाणार असल्याने शिक्षकांनी स्वत:चाच ई-मेल पत्ता नोंदवणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील मिळणार नाहीत, असेही नमूद करण्यात आले आहे.

शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांना माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे. शिक्षकांना देण्यात आलेल्या नोंदणी क्रमांकाचा वापर करून ते माहितीमध्ये दुरुस्ती करू शकतात. प्रशिक्षणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे, लवकरच तारखा जाहीर केल्या जातील.

– विकास गरड, उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद