पुणे : भारतीय वाहन निर्मिती उद्योग हा सध्या कृत्रिम प्रज्ञा, इलेक्ट्रिक वाहने, स्मार्ट कनेक्टेड सोल्यूशन्स व स्वयंचलित वाहन तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून झपाट्याने बदलत आहे. या बदलांचा वेध घेणारे ‘ईव्ही अँड ऑटोटेक इनोव्हेशन फोरम’चे तिसरे पर्व हे येत्या बुधवारी (ता. ९) पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.
देशभरातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक, वाहन उद्योगातील आघाडीच्या कंपन्या तसेच तंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञ या परिषदेच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. ही परिषद ताज विवांता, हिंजवडी येथे होत आहे. भारतीय व जागतिक वाहन निर्मिती क्षेत्रात कनेक्टेड मोबिलिटी, स्मार्ट डिजिटल कॉकपिट, सॉफ्टवेअर-नियंत्रित वाहने (एसडीव्ही), ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (एडीएएस) तसेच पुढील पिढीच्या इलेक्ट्रिक वाहन रचनांमुळे मोठे बदल घडत आहे. याच पार्श्वभूमीवर परिषदेत या नवीन प्रवाहांचा आढावा घेतला जाणार आहे.
या परिषदेत वाहननिर्मिती कंपन्या, मूळ उपकरण व अभिकल्पना उत्पादक, इलेक्ट्रॉनिक्स व संवेदक उपकरण कंपन्या, स्मार्ट साधने आणि माहिती-मनोरंजन तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पादक, गुंतवणूकदार तसेच वाहन उद्योगातील धोरणनिर्माते असे सुमारे तीनशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तसेच, या परिषदेत सॉफ्टवेअर-नियंत्रित वाहने, इलेक्ट्रिक वाहने, शाश्वत वाहतूक उपाय आणि अत्याधुनिक वाहन तंत्रज्ञानाशी निगडित सादरीकरण करणारा प्रात्यक्षिक विभाग आणि नावीन्यपूर्ण वाहनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.