‘फिल्म इन्स्टिटय़ूट’मध्ये या वर्षीच्या बॅचपासून श्रेयांक मूल्यमापन पद्धती व ‘सेमिस्टर’ पद्धतीने मूल्यमापन सुरू करण्यास बुधवारी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून संस्थेत अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचारही या वेळी मांडण्यात आला. विद्या परिषदेचे अध्यक्ष बी. पी. सिंग या बैठकीस उपस्थित होते.

सुधारित अभ्यासक्रमावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. हा अभ्यासक्रम सध्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू नसेल. श्रेयांक मूल्यमापन पद्धती आणि ‘सेमिस्टर’ पद्धती या अभ्यासक्रमाची वैशिष्टय़े असणार आहेत. संस्थेचे संचालक भूपेंद्र केंथोला म्हणाले,‘‘आतापर्यंत तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात दर वर्षांच्या शेवटी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत असे. आता दर सहा महिन्यांनी मूल्यमापन होणार आहे. अभ्यासक्रमात विविध ‘मॉडय़ूल्स’ ठेवली असून एकेका मॉडय़ूलचा अभ्यास करून त्यावर लक्ष्य केंद्रित केले जाईल. नवीन अभ्यासक्रम आता नियामक मंडळाच्या बैठकीत मांडला जाईल व त्यांच्या मान्यतेनंतर तो अमलात येईल.’’

श्रेयांक पद्धतीबाबत केंथोला म्हणाले,‘‘नवीन अभ्यासक्रम तयार करताना अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले गेले. श्रेयांक पद्धतीदेखील अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक संस्थांमध्ये वापरात आहे.