सर्वपक्षीय नेते, नगरसेवकच आघाडीवर; दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी दहा हजारांची उपस्थिती

पिंपरी : दिवाळीच्या निमित्ताने उद्योगनगरीत आयोजित करण्यात आलेल्या बहुतांश कार्यक्रमांमध्ये करोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आले. करोना नियमांना तिलांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी, नगरसेवक आघाडीवर असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते.

पिंपरी पालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यादृष्टीने इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवाळीचे औचित्य साधून त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. यापूर्वी तुरळक प्रमाण असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांची संख्या यंदा कित्येक पटीने वाढली होती आणि त्याला मिळणारा प्रतिसादही लक्षणीय होता. निगडी प्राधिकरणातील एका नगरसेवकाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात तब्बल १० हजार नागरिकांनी हजेरी लावली होती.

दीपोत्सव, फराळ तसेच भेटवस्तूंचे वाटप, विविध शिबिरे, कीर्तन महोत्सव, इतर धार्मिक कार्यक्रम, दिवाळी फराळांसारखे उपक्रम असे कित्येक कार्यक्रम सांगता येतील, ज्या ठिकाणी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. बहुतांश ठिकाणी नागरिकांनी मुखपट्टी घातली नव्हती. सुरक्षित अंतर पाळण्याचे कोणाच्या गावीही नव्हते. बाजारपेठा, चौकाचौकांमध्ये गर्दीचा कहर होता. पोलिसांनी तसेच पालिकेकडून नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. राजकीय पाश्र्वभूमी असणारे कार्यकर्ते,तसेच नगरसेवकांनीही तोच कित्ता गिरवत करोना नियम पायदळी तुडवण्यातच धन्यता मानल्याचे दिसून आले.