ग्रामीण भागातील ८२.५२ टक्के, शहरी भागातील ४९.७५ टक्के शाळा सुरू

पुणे : जवळपास पावणेदोन वर्षांच्या खंडानंतर राज्यातील ग्रामीण भागात पहिली ते चौथी, शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा बुधवारी सुरू झाल्या. ग्रामीण भागात चौथीपर्यंतच्या ८२.५२ टक्के, शहरी भागात सातवीपर्यंतच्या ४९.७५ टक्के शाळा सुरू झाल्या असून, ग्रामीण भागात ४८.४० टक्के आणि शहरी भागात २०.७१ टक्के विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित असल्याचे शिक्षण विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीवरून दिसते. 

करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शैक्षणिक क्षेत्र विस्कळीत झाले आहे. ऑनलाइन शिक्षणातील मर्यादांमुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची मागणी नवे शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू झाल्यावर करण्यात येऊ लागली. त्यामुळे करोनामुक्त भागात आठवी ते बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू करण्यात आले. तर ग्रामीण भागातील पाचवीपासूनचे आणि शहरी भागात आठवीपासूनचे वर्ग ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक शाळाही सुरू करण्याची मागणी जोर धरू लागल्याने १ डिसेंबरपासून राज्यातील सर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या उपप्रकाराच्या प्रादुर्भावाची शक्यता विचारात घेऊन काही स्थानिक प्राधिकरणांनी १५ डिसेंबपर्यंत प्राथमिक शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला.

या पार्श्वभूमीवर राज्यात बऱ्याच जिल्ह्यांतील प्राथमिक शाळांतील वर्ग बुधवारपासून सुरू झाले. पावणेदोन वर्षांच्या खंडानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. राज्यात सुरू झालेल्या शाळांची आकडेवारी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने संकलित केली आहे. या आकडेवारीनुसार ग्रामीण भागात चौथीपर्यंतच्या ८२.५२ टक्के, शहरी भागात सातवीपर्यंतच्या ४९.७५ टक्के शाळा सुरू झाल्या असून, ग्रामीण भागात ४८.४० टक्के आणि शहरी भागात २०.७१ टक्के विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित होते. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांतील, विशेषत: ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे विस्कळीत झालेले शिक्षण पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.