पुणे : हिवळ्यामध्ये खूप जास्त भूक लागणे किंवा जास्त जेवण करणे सामान्य गोष्ट आहे. मात्र, भूक जास्त लागते म्हणून काहीही खाणे योग्य आहे का ? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर, काळजी करू नका. शरीराचे तापमान कमी होते, जास्त तहान लागत नाही आणि पचनशक्ती सुधारलेली असते, अशा अनेक कारणांनी हिवाळ्यात भूक लागण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे सतत खाण्याची ईच्छा होते. अशा वेळी आहाराकडे अधिक लक्ष देऊन खाद्यपदार्थांचे योग्य नियोजन करण्याची गरज आहारतज्ज्ञ अधोरेखित करतात.
हिवाळा सुरू झाला की, काही खास पदार्थांच्या तयारीची लगबग स्वयंपाकघरात सुरू होते. डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, उडदाचे लाडू, तिळगूळ, तिळपोळी, गूळपोळी, पुरणपोळी, गाजर हलवा अशा पदार्थांची गोडी जिभेवर रेंगाळू लागते. तीळ, शेंगदाणे, काजू, बदाम, अंजीर, खजूर, खारीक, डिंक, अहळी, उडीद हा सुकामेवा गोड पदार्थांच्या चवीत आणखी भर टाकतो.
हिवाळ्यात पारंपरिक पदार्थांच्या जोडीने सामिष पदार्थांच्या मेजवान्या सर्रास सुरू होतात. शरीराचे तापमान कमी झाल्याने एरवी उष्ण, पचायला काहीसे जड असलेले हे पदार्थ थंडीत आरोग्यदायी ठरतात. हवा चांगली असल्यामुळे पचनही सहज होते. त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचे असते त्यांच्यासाठी हिवाळा ही पर्वणीच असते. याउलट वजन कमी करायचे असेल तर, हिवाळ्यात खाण्याच्या सवयी बदलण्याबरोबर व्यायामाकडेही लक्ष द्यावे लागते.
आहारतज्ज्ञ डॉ. अर्चना रायरीकर सांगतात,‘हिवाळ्यात आहाराकडे अधिक लक्ष दिल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी असते. हवा चांगली असल्यामुळे पचनक्षमता सुधारलेली असते. त्याचबरोबर तहान कमी लागत असल्यामुळे जेवण अधिक जाते. नुसत्या पाण्याने पोट भरत नाही. अशा कारणांमुळे हिवाळ्यात भूक जास्त लागत असते.’
‘हिवाळ्यात भूक जास्त लागते म्हणून काहीही खात राहणे योग्य नाही. आहाराचे योग्य नियोजन केल्यास या थंडीचा फायदा होतो. ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांनीही हिवाळा आहे म्हणून काहीही कोणतेही खाद्य पदार्थ प्रमाणाबाहेर खाऊ नयेत. आहाराचे योग्य नियोजन या काळात अधिक गरजेचे असते. त्यासाठी प्रत्येकाने शरीराची गरज आणि क्षमता ओळखून आहार घ्यायला हवा,’ असेही त्यांनी नमूद केले.
‘भूक लागली म्हणून लवकर मिळणारे मैद्याचे, तेलात तळलेले बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळायले हवे. आपण आज आपल्या शरीराला जे काही देतो, बऱ्याचदा त्याचा परिणाम लवकर दिसत नाही. मात्र, ठराविक काळ गेल्यानंतर अनेक आजार उद्भवू लागतात. त्यामागे असंतुलित आहाराचे कारण असते. त्यामुळे आता आपण काय खातो, याकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे,’ असेही रायरीकर यांनी सांगितले.
सध्या बाजारात पौष्टिक खाद्यपदार्थही सहज उपलब्ध होत आहेत. आपल्याला सकस आणि संतुलित आहार घ्यायचा की, नाही हे आपणच निवडायला हवे. खूप भूक लागली म्हणून झटापट मिळणारे, आरोग्याला हानिकारक असलेले खाद्यपदार्थ न घेता फुटाणे, शेंगदाणे किंवा काजू, बदाम, बेदाण्यांसारखा सुकामेवा जवळ ठेवायला हवा. चांगल्या आरोग्यासाठी आपणही सकस आहाराचे पर्याय शोधायला हवेत. – अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ
