अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील सातवी फेरी अर्थात दैनंदिन गुणवत्ता फेरीला विद्यार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दैनंदिन गुणवत्ता फेरीअंतर्गत प्रवेशांसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येईल.

हेही वाचा- पुणे : चांदणी चौकातील वाहतूक ११ तासांनी पूर्ववत

राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित, तीन विशेष प्रवेश फेर्‍या राबवण्यात आल्या. मात्र काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात सतत विशेष फेरी सुरू करण्यात आली आहे. या फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश फेरी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा- पुणे : दुचाकीवरुन प्रवासी वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्याला धमकी

विद्यार्थ्यांना संध्याकाळी सात ते सकाळी नऊ दरम्यान अर्ज करता येईल. तर सकाळी १० ते संध्याकाळी पाच दरम्यान प्रवेश घेता येईल. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा पुढील दिवसाच्या फेरीसाठी आपोआप विचार केला जाईल. प्रवेशासाठी निवड होऊनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयासाठी पूर्ण फेरीदरम्यान प्रतिबंधित केले जाईल. प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांनाही त्या महाविद्यालयासाठी प्रतिबंधित केले जाईल. यापुढे प्रवेश रद्द करण्याची परवानगी असणार नाही.

हेही वाचा- राज्यात हंगामातील पाऊस सरासरीपुढेच; जाणून घ्या तुमच्या भागात किती पाऊस पडणार

नवीन विद्यार्थी नोंदणी, नवीन अर्ज भाग एक भरणे आणि त्यामध्ये बदल करण्यासाठी अर्ज अनलॉक करण्याची प्रक्रिया ४ ऑक्टोबरपासून बंद होईल. अर्ज पडताळणी फक्त शिक्षण उपसंचालक लॉगिनवरूनच केली जाऊ शकेल. ४ ऑक्टोबरपासून मार्गदर्शन केंद्र लॉगिन बंद होतील. कोणताही नवीन अर्ज आपोआप प्रमाणित होणार नाही. प्रत्येक नवीन नोंदणी शिक्षण उपसंचालकांनी तपासणी केलेनंतरच पूर्ण होईल. ही फेरी दिनांक १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. कोटा आणि द्विलक्ष्यी प्रवेश प्रक्रिया नेहमीप्रमाणे सुरू असतील. दुबार प्रवेश घेतल्याचे किंवा जाणीवपूर्वक जागा अडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत कडक कारवाई केली जाईल असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.