मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याला कारागृह प्रशासनाने आणखी १४ दिवस रजा (फरलो) मंजूर केली आहे. संजय दत्त सध्या १४ दिवसांच्या रजेवरच येरवड्यातील कारागृहातून बाहेर पडला असून, तो मुंबईमध्ये आहे. वैद्यकीय कारणांसाठी आणखी चौदा दिवसांची अभिवाचन रजा (फरलो) वाढवून देण्यासाठी त्याने कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्यावर सोमवारी निर्णय घेण्यात आला.
कारागृह प्रशासनाकडून संजय दत्तला एक ऑक्टोबरला चौदा दिवसांची अभिवाचन रजा मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत तो येरवडा कारागृहात परत येणे अपेक्षित होते. मात्र, संजय दत्तकडून वैद्यकीय कारणामुळे आणखी चौदा दिवसाची अभिवाचन रजा वाढवून देण्यासाठी मागणी कारागृह प्रशासनाकडे केली होती. नियमानुसार कैद्याला चौदा दिवसांची मुदत वाढ मिळू शकते. याबाबत कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी सांगितले. याच नियमानुसार संजय दत्तच्या रजेला १४ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.
संजय दत्तला न्यायालयाने पाच वर्षे शिक्षा सुनावली असून, त्यापैकी त्याने अठरा महिन्यांची शिक्षा भोगली आहे. त्यानंतर मे २०१३ पासून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. शिक्षेचा विशिष्ट कालावधी त्याने पूर्ण केला असल्यामुळे त्याला चौदा दिवसांची अभिवाचन रजा मंजूर करण्यात आली होती.