महापालिका निवडणुकीसाठीचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी ६ डिसेंबपर्यंत मुदत

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याकरता निवडणूक आयोगाने ६ डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आराखडा तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. यापूर्वीच्या नियोजनानुसार ३० नोव्हेंबर रोजी कच्चा आराखडा पूर्ण करून निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार होता. मात्र, आराखडय़ाचे काम सुरू असल्याने महापालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे १५ दिवसांची मुदतवाढ मागितली होती.

नवीन वर्षांत फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा एक प्रभाग निश्चित करण्यात आला आहे. करोनामुळे चालू वर्षी जनगणना होऊ शकलेली नाही. परिणामी सन २०११ ची लोकसंख्याच गृहित धरली जाणार आहे. मात्र, राज्य सरकारने गेल्या दहा वर्षांत लोकसंख्या वाढल्याने कायद्यात बदल करून महापालिकांची सदस्य संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेची सदस्यसंख्या १६१ वरून १७३ एवढी निश्चित करण्यात आली आहे. नगरसेवकांची संख्या वाढल्याने प्रभागांची संख्या ४२ वरून ५५ एवढी होणार आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचनेकडे नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. नवा प्रभाग कसा तयार होणार, त्याला कोणता भाग जोडला जाणार, तसेच कोणता भाग वगळण्यात येणार या बाबी कच्च्या आराखडय़ानंतर समोर येणार आहेत. महापालिकेने १५ दिवसांची मुदतवाढ मागितली असताना निवडणूक आयोगाने ६ डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे.