Pune Crime News: मसाज पार्लरमध्ये देहविक्री सुरू असल्याचा आरोप करुन मसाज पार्लर चालक महिलेकडून ३० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांसह पाच जणांना खराडी पोलिसांनी अटक केली. खराडी भागात ही घटना घडली.
या प्रकरणी प्रतीक जयवंत गायकवाड (वय ३१, रा. कामराजनगर, येरवडा, तसेच लांडाेबा वस्ती, केसनंद), विशाल अशोक साळवे (वय ४०, रा. शंकरराव जाधवनगर, विश्रंतवाडी), रोहित नागनाथ मांढरे (वय ३२, रा. येरवडा), छाया सुखदेव कांबळे (वय ४०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), सुनीता संजय लोंढे (वय ४३, रा. टेम्पो चौक, वडगावशेरी) यांना अटक करण्यात आल याबाबत एका महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी भागात मसाज पार्लर आहे. मसाज पार्लरमध्ये देहविक्रय करते, असा आरोप आरोपींनी केला होता. दोन महिला आणि साथीदारांनी महिलेला धमकावले. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार करणार आहोत, असे सांगून महिलेकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. एका आरोपी महिलेने तक्रारदार महिलेला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तडजोडीत दीड लाख रुपयांची खंडणी मागितली.
त्यानंतर तक्रादार महिलेने आरोपींना ३० हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी पोलिसांकडे तक्रार करणार नाही, असे सांगितले. पोेलिसांकडून कारवाई होणार नाही. आम्ही मध्यस्थी करु, असे आरोपींनी महिलेला सांगितले. गुरुवारी (१४ मे) महिलेला कोरेगाव पार्क परिसरात उर्वरित रक्कम घेऊन कोरेगाव पार्क भागात बोलाविले. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, खंडणी, धमकी, तसेच मारहाण प्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला. पसार झालेल्या दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, उपनिरीक्षक बिडवे आणि पथकाने ही कामागिरी केली.
या प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी छाया कांबळे ही सामाजिक कार्यकर्ती म्हणून वावरत होती. आरोपी सुनीता लोंढे ही सुरक्षाक्षक म्हणून काम करते. आरोपींनी अशा पद्धतीने आणखी काही गुन्हे केले आहेत का ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
पादचारी शिक्षिकेचे मगळसूत्र हिसकावले
पादचारी शिक्षिकेचे दीड लाखांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत शिक्षिकेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिक्षिका बुधवारी (१३ मे) रात्री नऊच्या सुमारास आंबेगावमधील दत्तनगर परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. शिक्षिकेने आरडाओरडा केला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दत्तनगर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.
शिवाजीनगर भागात हॉटेलमध्ये चोरी
शिवाजीनगर भागताील हॉटेलमधील खोलीतून एक लाख ७० हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली.
या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे छत्तीसगडमधील राजनंदगाव परिसरातील राहायला आहेत. ते कामानिमित्त पुण्यात आले होते. शिवाजीनगर स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी खोली भाड्याने घेतली होती. रात्री झोपताना त्यांना उशीखाली एक लाख ७० हजार रुपयांची सोन्याची अंगठी ठेवली होती. चोरट्याने त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून उशीखाली ठेवलेली अंगठी चोरुन नेली. अंगठी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून हाॅटेलमधील कामगारांची चौकशी करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.
