विमाननगर भागातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविकेच्या पतीला धमकावून २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या एका कथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.जितेंद्र अशोक भोसले (रा. विमाननगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत नगरसेविकेच्या पतीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसले याच्या विरुद्ध यापूर्वी खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. तक्रारदाराच्या मिळकतीत बेकायदा बांधकाम करण्यात आल्याचा आरोप भोसलेने केला होता. त्याने महापालिका तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) तक्रार अर्ज केले होते.

हेही वाचा >>> पुणे : चांदणी चौक परिसरातील सेवा वाहिन्यांच्या स्थलांतराला गती

मिळकतीतील बांधकामाची तपासणी करुन बेकायदा बांधकाम झाले नसल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत तुमची बदनामी करतो. समाजमाध्यमातून बदनामी करण्याची धमकी देऊन भोसलेने नगरसेविका तसेच तिच्या पतीकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर भोसलेने नगरसेविका आणि पतीची भेट घेतली. त्यांच्याकडे २५ लाखांची खंडणी मागितली.त्यानंतर नगरसेविकेच्या पतीने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. तक्रार अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे तपास करत आहेत.