scorecardresearch

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शीची उलटतपासणी पूर्ण

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे.

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे. या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी  साक्षीदाराची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली. पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार आहे. या दिवशी डॉ. दाभोलकर यांचे शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे तसेच बचाव पक्षाकडून त्यांची उलटतपासणी घेण्यात येणार आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात महापालिकेतील सफाई कर्मचारी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. प्रत्यक्षदर्शीची साक्ष सरकार पक्षाकडून नोंदविण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची साक्ष प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने  दिली. त्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उलटतपासणी बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर, अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, अ‍ॅड. सुवर्णा आव्हाड-वस्त यांनी नुकतीच घेतली. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) विशेष न्यायालयात सहा साक्षीदार सादर केले आहेत. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे यांच्यासह विक्रम भावे, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eyewitness cross examination completed in dr narendra dabholkar murder case zws