करोना काळात शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती काही तांत्रिक कारणास्तव शाळांना एमडीएम पोर्टलवर भरता आली नाही. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना पूर्वीच्या नोंदीची (बॅकडेटेड) माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुणे : गुजरातचे राज्यपाल देवव्रत यांच्या उपस्थितीत नैसर्गिक शेती कार्यशाळा

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमार्फत दैनंदिन आहार घेणाऱ्या लाभार्थींच्या उपस्थितीची माहिती एमडीएम संकेतस्थळ, मोबाईल ॲपच्या माध्यमातून अद्ययावत करण्यात येते. शाळांनी ऑनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे इंधन-भाजीपाला, धान्यादींची देयके तयार करून शाळांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येते. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळांची ऑनलाइन उपस्थितीची माहिती भरण्याचे काम बंद असणे, दरम्यानच्या कालावधीमध्ये कोरड्या स्वरूपातील धान्यादीचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आल्यामुळे ऑनलाइन उपस्थिती नोंदवण्यात आली नाही. मार्च २०२२पासून शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिला जात आहे. परंतु अनेक शाळांचे ॲप अद्ययावत नसणे, शिक्षकांची नोंदणी नसणे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे दैनंदिन उपस्थितीची माहिती भरणे प्रलंबित असल्याची निवेदने प्राथमिक संचालनालयाकडे दाखल झाली.

हेही वाचा >>> पुणे विद्यापीठातील शुल्कवाढ मागे घेतलीच पाहिजे ; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांची भूमिका

या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सर्व जिल्ह्यांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि बृहन्मुंबईचे शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या सूचनांनुसार मार्च २०२२ ते सप्टेंबर २०२२ पर्यंतच्या दैनंदिन प्रलंबित उपस्थितीची नोंद करण्यासाठी केंद्र प्रमुख, तालुका लॉगीनवर ४ ऑक्टोबरपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कालावधीत शाळांची दैनंदिन उपस्थिती प्रलंबित असल्यास अद्ययावत करावी. संचालनालयस्तरावरून देयके तयार करण्यात आल्यानंतर पुन्हा कोणतीही सुविधा दिली जाणार नाही. शालेय पोषण आहार योजनेस पात्र सर्व शाळा एमडीएम संकेतस्थळावर उपस्थितीची माहिती अद्ययावत करीत असल्याचा आढावा घेण्याबाबत स्पष्ट केले आहे.