scorecardresearch

आगाऊ मुद्रांक शुल्क भरून चार महिन्यांत दस्त नोंदणीची सुविधा

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून १ एप्रिल रोजी नवे चालू बाजारमूल्य दर (रेडिरेकनर) जाहीर करण्यात येणार आहेत.

पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून १ एप्रिल रोजी नवे चालू बाजारमूल्य दर (रेडिरेकनर) जाहीर करण्यात येणार आहेत. रेडिरेकनर दरांत वाढ होणार असल्याची चर्चा असल्याने सध्या राज्यभरात नागरिकांची दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी गर्दी होत आहे. मात्र, मुद्रांक शुल्क भरलेल्या दिवसापासून पुढील चार महिन्यांत कधीही दस्त नोंदविता येईल. तशी कायद्यात तरतूद असून, त्यानुसार नागरिकांना मुद्रांक शुल्क भरून पुढील चार महिन्यांत दस्त नोंदणी करण्यासाठी आठ दिवस शिल्लक राहिले आहेत.

रेडिरेकनरचे दर वाढले तरीही ३१ मार्चअखेर दस्त नोंदणी केल्यास पुढील चार महिन्यांत जुन्याच रेडिरेकनरच्या दराने दस्त नोंदणी केली जाईल. करोना संकटामुळे सन २०२० मध्ये १ एप्रिल रोजी रेडिरेकनरचे दर जाहीर करण्यात आले नव्हते. त्यापूर्वी दोन वर्षे रेडिरेकनर दरात वाढ करण्यात आली नव्हती आणि करोनामुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत असल्याने सप्टेंबर २०२० मध्ये काही प्रमाणात दरांत वाढ करण्यात आली होती. तसेच रेडिरेकनर दर वाढवून केवळ सहाच महिने झाल्याने गेल्या वर्षी (एप्रिल २०२१) दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे कारण सांगत यंदा दर वाढवण्यात येणार असल्याचे पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील शहरी भागात काही प्रमाणात, तर ग्रामीण भागात सहा ते दहा टक्के वाढ प्रस्तावित असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागाच्या प्रभावक्षेत्रातील (शहरे किंवा महानगरांलगत असलेला भाग) वाढते नागरीकरण लक्षात घेऊन त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात विकास होऊन मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार वाढतील, हे गृहीत धरून ही वाढ प्रस्तावित आहे. तरतूद अशी.. नोंदणी अधिनियम १९०८ च्या कलम २३ अनुसार मुद्रांक शुल्क भरलेल्या दिवसापासून पुढील चार महिन्यांत कधीही दस्त नोंदविता येतो. त्यानुसार ३१ मार्चपूर्वी मुद्रांक शुल्क भरणाऱ्या नागरिकांना ३१ जुलैपर्यंत सध्याच्या रेडिरेकनरनुसारच दस्त नोंदणी करता येणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Facility registration four months paying advance stamp duty ysh

ताज्या बातम्या