लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या १११ रिक्त पदांच्या भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या १४ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. नव्याने जाहिरात प्रसिद्ध झाल्याने विद्यापीठाची नऊ महिने रखडलेली भरती प्रक्रिया आता मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.

विद्यापीठातील शैक्षणिक विभागांतील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीला राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर डिसेंबरमध्ये १११ पदांसाठी विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध केली. त्यासाठी पाच हजारांहून अधिक उमेदवारांनी विद्यापीठाकडे अर्ज केले. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, आरक्षणासारख्या तांत्रिक अडचणींमुळे या भरती प्रक्रियेला विलंब झाला. अर्ज केलेले पाच हजारांहून अधिक उमेदवार भरती प्रक्रियेकडे डोळे लावून बसले होते. त्यानंतर प्राध्यापक भरतीसाठी मराठा आरक्षण लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. त्यामुळे सुधारित जाहिरात प्रसिद्ध करून नव्याने पदभरतीची प्रक्रिया करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी सुधारित जाहिरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.

आणखी वाचा-पुणे : मध्यभागातील रस्ते गर्दीने फुलले! सलग सुट्यांमुळे सहकुटंब देखावे पाहण्याचा आनंद

विद्यापीठाने नव्याने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार एकूण १११ पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यात प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदासाठी प्रत्येकी ३२ जागा, तर सहायक प्राध्यापक पदासाठीच्या ४७ जागांचा समावेश आहे. जाहिरातीमध्ये पदासाठीची पात्रता, पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठात बऱ्याच वर्षांनी प्राध्यापक भरती होणार आहे. मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने विद्यापीठातील कामकाज अतिरिक्त कार्यभाराने चालवावे लागत आहे. आता पदभरती प्रक्रियेतून १११ जागा भरल्या जाणार असल्याने विद्यापीठातील शैक्षणिक, प्रशासकीय कामाचा ताण थोड्याफार प्रमाणात हलका होण्याची अपेक्षा आहे.

तज्ज्ञांची मार्गदर्शक समिती

दीर्घ कालावधीनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला प्राध्यापक भरतीची संधी मिळाली आहे. विद्यापीठाच्या अध्यापन व संशोधन क्षेत्रातील गौरवशाली परंपरेला साजेशी मनुष्यबळाची उपलब्धी ही महत्त्वाची बाब आहे. या भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, मिळालेल्या संधीचे अधिक चांगले पर्यवसान होण्यासाठी दीर्घकालीन विचार करून गुणवत्तापूर्ण उमेदवारांची निवड होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मार्गदर्शक समिती नियुक्त करण्यात आली आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.

आणखी वाचा-असा देखावा पाहिलाच नसेल! १५ फूट ऊंच बॅट, वर्ल्ड कपची ट्रॉफी आणि भल्या मोठ्या चेंडूत गणपती बाप्पा

नव्या वर्षात प्राध्यापक मिळणार?

येत्या काही दिवसांत राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. प्राध्यापक भरतीची सुधारित जाहिरात आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध झाल्याने आता भरती प्रक्रियेतील मुलाखतींची प्रक्रिया राबवणे शक्य होणार आहे. त्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे विद्यापीठाला नव्या वर्षात प्राध्यापक मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.