पुणे : महाराष्ट्र विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असल्याचा दावा राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून केला जातो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि ते घेत असलेल्या ठोस भूमिकेमुळे हे शक्य झाल्याचे सांगितले जाते. मात्र आवश्यक सोयी सुविधा मिळत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीमुळे अनेक कंपन्यांनी आपला कारभार इतर राज्यात हलविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यावर काँग्रेस पक्षाने सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. वाहतूक कोंडी आणि उपलब्ध नसलेल्या पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्रातून कंपन्या स्थलांतरित होत आहेत. ‘देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे इन्फ्रा मॅन नाहीत, तर डिझास्टर मॅन आहेत,’ अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये चाकण येथील २० कंपन्यांनी दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे? या बाबत सकपाळ यांचा विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. राज्यात उद्योग आणण्याऐवजी वाहतूक कोंडी तसेच पायाभूत सुविधा मिळत नसल्याने अनेक कंपन्या राज्याबाहेर जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीवर बोलताना सपकाळ म्हणाले, ‘काँग्रेसच्या काळात आरक्षण देण्यात आले होते; मात्र ते पुढे टिकले नाही. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांची वाढविण्याची राजकीय इच्छाशक्ती भाजप सरकारने दाखविली असती, तर हा प्रश्न मार्गी लागला असता. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत जातिनिहाय जनगणना झाली असती, तर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यास मोठी मदत झाली असती.’

‘गुंगी गुडिया’वरून भाजपला टोला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख ‘गुंगी गुडिया’ केल्यावरून निर्माण झालेल्या वादावर सपकाळ यांनी हा शब्द राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत वापरला होता, असे स्पष्ट केले. त्यामुळे त्याचा संदर्भ आणि इतिहास समजून घेण्याची गरज असल्याचे सपकाळ यांनी नमूद केले.

कुंभमेळा गैरव्यवहारावर गंभीर आरोप

कुंभमेळ्यातील कथित गैरव्यवहारावरून देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीका केली. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप करताना, ‘संधीसाधू गिरीश महाजन स्वतःच्या बगलबच्च्यांना वर्क ऑर्डर देत आहेत,’ असा थेट आरोप सपकाळ यांनी केला. भाजप सरकार समाजात भ्रष्टाचाराचे विष पसरवत असल्याची टीकाही त्यांनी केली.