पुणे : उपाहारगृह चालकाच्या मुलाचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात गेले दीड वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने अटक केली. फैसल उर्फ बटाव उस्मान खान (वय ४२, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
येरवडा भागातील एका चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या उपाहारगृह चालकाच्या मुलावर खान याने तीक्ष्ण शस्त्राने वार करुन गल्ल्यातील रोकड लुटली हाेती. या प्रकरणी दीड वर्षांपूर्वी त्याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल केल्यानंतर पसार झाला होता. तेव्हा पासून त्याचा शोध घेण्यात येत होता. खान हा भवानी पेठेतील कासेवाडी भागात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पोलीस कर्मचारी नागेश कुंवर, विशाल इथापे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.
पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहायक फौजदार एकनाथ जोशी, अमजद शेख, तुषार खराडे, शरद झांजरे यांनी ही कारवाई केली.

