पुणे : हवाई दलातील जवानासारखा गणवेश परिधान करून वावरणाऱ्या एका व्यक्तीला लोहगाव पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तरुणाकडून हवाई दलातील बनावट ओळखपत्र आणि गणवेश जप्त करण्यात आला.

शुभम विलास अंबुरे (वय २६, सध्या रा. स्वप्ननगरी सोसायटी, शिक्रापूर रस्ता, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत हवाई दलातील जवान ब्रिजेशकुमार मिश्रा (वय ४८) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबुरे याने लोहगावमधील गुरुद्वारा रस्त्यावरील एका टेलरिंग दुकानातून हवाई दलातील जवानासारखा गणवेश शिवून घेतला होता. त्याने हवाई दलातील जवानाचे बनावट ओळखपत्र तयार करून घेतले. बनावट ओळखपत्र बाळगून, तसेच हवाई दलातील जवानासारखा गणवेश परिधान करून तो वावरत होता. याबाबत हवाई दलातील अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडण्यात आले. अंबुरे याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अंबुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याने हवाई दलातील जवानासारखा गणवेश का परिधान केला, तसेच त्याने ओळखपत्र कसे तयार केले, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिंंदे तपास करत आहेत.