पुणे : पुण्यात पकडलेल्या २८ लाखांच्या बनावट नोटांचा पुरवठा परराज्यांतून झाल्याची माहिती तपासात निदर्शनास आली आहे. परराज्यातील टोळीने देशभरात बनावट नोटा छापून वितरित केल्याचा संशय आहे. या टोळीच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पोलिसांची पथके परराज्यांत रवाना झाली आहेत.
पुणे शहर परिसरात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात आले. शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २८ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी मनीषा स्वप्नील ठाणेकर (वय ३५, रा. नागपूर चाळ, येरवडा), भारती तानाजी गावंड (वय ३४, रा. केशवनगर, चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर ( वय ३५, रा. गहुंजे), नरेश भीमाप्पा शेट्टी (वय ४२,रा. लोहगाव) आणि प्रभू गुगलजेड्डी (वय ३८, रा. चिंचवड) यांना अटक करण्यात आली. पाच आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे.
बनावट निर्मिती, तसेच वितरण करणाऱ्या या टोळीत आणखी काही जण सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. तसेच, बनावट नोटांचा पुरवठा परराज्यांंतून झाल्याचाही संशय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बनावट नोटांच्या प्रकरणात आरोपी शेट्टी, गुगुलजेड्डी यांची सखोल चौकशी करण्यात आली. परराज्यातील टोळीने बनावट नोटा छापून देशभरात वितरित केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
आरोपी शेट्टी आणि गुगलजेड्डी हे एक लाख रुपयांत दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा देत होते. शेट्टी लोहगाव परिसरात राहायला आहे. त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्याच्या घरातून एकाच बाजूने छपाई केलेल्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. परराज्यातील टोळीने शेट्टीला बनावट नोटांची छपाई करण्यासाठी मदत केली होती. आर्थिक व्यवहार फिसकटल्याने या टोळीतील काही जणांनी शेट्टीला एकाच बाजूने छपाई केलेल्या नोटा छापून दिल्या. व्यवहार फिसकटल्याने ते परराज्यात पसार झाल्याचे उघडकीस आले आहे.
आरोपी गुगलजेड्डी हा या प्रकरणातील सूत्रधार शेट्टीचा मेव्हणा आहे. गुगलजेड्डी परराज्यांतील टोळीच्या संपर्कात आला होता. परराज्यांतून बनावट नोटा आणून शेट्टीने बाजारात वितरित करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने आरोपी मनीषा ठाणेकरला हाताशी धरले. परराज्यातील टोळीने बनावट नोटा छापण्याचे तंत्र शिकविण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा संशय आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी आणि पथक अधिक तपास करत आहेत.