पुणे : सराइत चोरट्याला जामीन देण्यासाठी लष्कर न्यायालायात बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा प्रकार वानवडी पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बनावट आधारकार्ड, शिधापत्रिका अशी बनावट कागदपत्रे जप्त केली.याप्रकरणी संतोष शंकरराव तेलंग (वय ३२, रा. शेवाळवाडी ग्रामपंचायत कार्यालयामागे, हडपसर) याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सोमनाथ कांबळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक; भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर न्यायालयाचे स्थलांतर वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. सराइत चोरटा बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोड याला कोंढवा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. भोंडविरुद्ध चार गु्न्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यात भोंडला जामीन मिळवून देण्यासाठी लष्कर न्यायालयातील एका वकिलामार्फत तेलंग आणि साथीदारांनी बनावट कागदपत्रे सादर केली. कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तेव्हा बनावट आधारकार्ड, शिक्षापत्रिका सापडल्या. चौकशीत बनावट कागदपत्रे सादर करुन जामीन मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस आला. तेलंग याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत बनावट कागदपत्रे सापडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक टोणे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake documents presented in the military court to grant bail to a notorious thief pune print news rbk 25 zws