पुण्यात बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड बनवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बुलढाण्यातील रहिवासी असणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधीपथकानं सापळा रचून पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून आरोपीला जेरबंद केलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून दहा बनावट मतदार ओळखपत्रजप्त केली आहेत. यावेळी पोलिसांना आरोपीच्या संगणकात देखील अनेक बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड आढळली आहेत.

कल्पेश रमेश बोहरा (वय ४२, रा. नम्रता सदन, खामगाव, जि. बुलढाणा) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी मधुकर तुपसौंदर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी बोहरा हा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. तसेच तो नागरिकांना बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड तयार करून देण्याच काम करत होता. बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड तयार करून देण्यासाठी तो पैसे घ्यायचा. याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनीसापळा रचून त्याला अटक केली आहे.

आरोपी बोहरा याच्याकडे पोलिसांना वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाची दहा बनावट मतदार ओळखपत्रं आढळली आहेत. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून संगणक जप्त केला असून त्यामध्ये देखील बनावट मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड तसेच काहीजणांची छायाचित्रे आढळून आली आहेत. आतापर्यंत आरोपीनं अनेक नागरिकांना बेकायदेशीरपणे बनावट मतदार कार्ड आणि पॅनकार्ड बनवून दिल्याची शंका पोलिसांना आहे. या घटनेचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

आरोपी बोहरा बनावट मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये घेत होता, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.