पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत २५ जणांना नाेकरी लागल्याची बतावणी करून अधिकाऱ्यांच्या खाेट्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लक्षात येताच सामान्य प्रशासन विभागाने सध्या कोणत्याही पदासाठी भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. अफवांना काेणीही बळू पडू नये, असे आवाहन सह आयुक्त मनाेज लाेणकर यांनी केले आहे. 
 
समाजमाध्यमांवर महापालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचे भासवणारी खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली आहे.  महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे, उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांच्या मान्यतेने खाेटे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये शिपाई, लिपिक, लघुलेखक या पदांवर २५ जणांची नियुक्ती झाल्याचे म्हटले आहे. या २५ जणांनी पुढील काही तासात कर्मचारी महासंघाकडे लेखा विभागाअंतर्गत नाेंदणी करण्यासाठी दोन हजार ३९० रूपये जमा करणे बंधनकारक असल्याचा उल्लेख आहे. या पत्रावर तत्कालीन मुख्य लेखा अधिकारी, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

याबाबतचे पत्र सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मनाेज लाेणकर यांच्याकडे आले आहे. परंतु, महापालिकेकडून भरती प्रक्रियेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत आदेश अथवा सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत. बनावट जाहिराती व संदेशांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी प्रशासन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिकेच्या प्रशासन विभागाने केले आहे. 

‘महापालिकेत कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही. भरती प्रक्रियेबाबतची सर्व माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे इतर कोणत्याही माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये’, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मनाेज लाेणकर यांनी केले.