scorecardresearch

द्राक्ष दरात घसरण

यंदाच्या द्राक्ष हंगामात अवकाळी पाऊस, थंडी आणि धुक्यामुळे द्राक्ष उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

पुणे : यंदाच्या द्राक्ष हंगामात अवकाळी पाऊस, थंडी आणि धुक्यामुळे द्राक्ष उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. निर्यातक्षम द्राक्ष बागांनाही याचा फटका बसला आहे. जागतिक व्यापारात अनेक अडथळे असले, तरी युरोपियन देशांत होणारी निर्यात सुरळीत आहे. मात्र, दर कमी मिळत असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट होत असतानाच दरातही फटका बसत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत प्रति किलो ८ ते ९ रुपयांनी दरात घट झाली असून, यंदा ५०-५५ रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे.

देशात सरासरी एकूण द्राक्ष उत्पादन ३२ लाख टन इतके होते. राज्यात २४-२५ लाख टन उत्पादन होते. मागील वर्षी राज्यातून २.५ लाख टन द्राक्ष निर्यात झाली होती. त्यापैकी युरोपियन देशांना १ लाख १६ हजार टन निर्यात झाली. यंदा ३ मार्चअखेर युरोपियन देशांना ४० हजार ६९३ टन द्राक्ष निर्यात झाली आहे.

रशियाशी व्यापार सुरळीत

२०२०-२१ या आर्थिक वर्षांत रशियाला २४ हजार टन द्राक्ष निर्यात झाली होती. त्यातून २३६ कोटी रुपये मिळाले होते. तर युक्रेनला २ हजार ३६५ टन निर्यात झाली होती. त्यातून ३२ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. यंदा नोव्हेंबरअखेर एकूण ५६ हजार २०० टन निर्यात झाली असून, ४२१ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापैकी रशियाला ५ हजार ६५१ टन द्राक्ष निर्यात झाली, त्यातून ६९ कोटी रुपये मिळाले. युक्रेनला १६५ टन निर्यात झाली असून, त्यातून २ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

युक्रेन-रशिया युद्धाचा फारसा परिणाम द्राक्ष निर्यातीवर झालेला नाही. रशियाची सर्व बंदरे सुरू आहेत. युक्रेनला होणारी निर्यात मात्र बंद आहे. मात्र, युक्रेनला फारशी निर्यात होत नाही. युरोपियन देशांना होणारी निर्यात सुरळीत सुरू आहे. मार्च महिन्यात निर्यात सर्वाधिक होते. एप्रिलअखेपर्यंत निर्यात होईल.

– गोविंद हांडे, शेतीमाल निर्यात सल्लागार, कृषी विभाग

अवकाळीच्या नुकसानीनंतर आता दरातही फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. युरोपीयन देशांना होणारी निर्यात सुरळीत असली, तरी चीनला होणारी निर्यात अद्याप बंदच आहे. अपेडाने चीनला होणारी निर्यात तत्काळ सुरू करावी.

– शिवाजी पवार, अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Falling grape prices premature rain cold farmer farm loss ysh

ताज्या बातम्या