पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने गळा चिरून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री उशीरा उघडकीस आली. लॉजच्या खोलीला कडी लावून आरोपी पसार झाला असून, भारती विद्यापीठ पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

काजल कृष्णा कदम (वय २७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. काजल आणि कृष्णा मजूरी करतात. त्यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते. दोघांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला होता. मात्र, दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. शनिवारी दुपारी दोघेजण सातारा रस्त्यावरील अश्विनी लॉजमध्ये आले. दोघांनी लॉजमधील खोलीत मद्यप्राशन केले. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. कृष्णाने चाकूने तिचा गळा चिरला. त्यानंतर लॉजच्या खोलीला बाहेरून कडी लावून तो पसार झाला, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली.

हेही वाचा…पुणे : हेम्लेट परिधान करूनही ती बचावली नाही; एसटी चाकाखाली सापडून तरुणीचा मृत्यू

लॉजमधून पसार झालेल्या कृष्णाने या घटनेची माहिती मित्राला दिली. मित्राने याबाबतची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा काजल लॉजमधील खोलीत मृतावस्थेत सापडली. पसार झालेल्या कृष्णाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.