* मेंदू मृत महिलेचे अवयवदान * ‘रुबी हॉल’ ते विमानतळापर्यंतचा प्रवास केवळ पाच मिनिटांत

अपघातात जबर मार लागलेल्या मेंदू मृत महिलेचे हृदय नातेवाइकांच्या संमतीने मंगळवारी दान करण्यात आले असून पुण्यातून ते दिल्लीतील रुग्णासाठी व्यावसायिक विमानाने पाठवण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने रुबी हॉल रुग्णालयातून विमानतळापर्यंत मुक्त मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) तयार करून केवळ पाच मिनिटांत हे हृदय विमानतळावर पोहोचवण्यात आले. ही देखील एक विक्रमी वेळ ठरली.

पुण्यातून गतवर्षी एप्रिल महिन्यात दिल्लीतील ‘एम्स’ला (ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स) एक हृदय पाठवण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीला हृदय पाठवण्याची ही दुसरी वेळ आहे. पुण्यातून चेन्नईलाही यापूर्वी हृदय पाठवण्यात आले आहे.  विमानाने पुणे ते दिल्ली प्रवासास साधारणत: २ तास १० मिनिटे लागतात.

बारामती- जेजुरी रस्त्यावर झालेल्या अपघातात एक ४३ वर्षांची महिला जबर जखमी झाली होती. या महिलेस मेंदू मृत घोषित करण्यात आल्यावर तिचे अवयव दान करण्यासाठी नातेवाइकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांच्या संमतीनंतर रुग्णाच्या यकृताचे ‘रुबी’मध्येच दुसऱ्या एका ५० वर्षांच्या महिलेवर प्रत्यारोपण करण्यात आले. मेंदू मृत रुग्णाची त्वचा व डोळ्यांमधील ‘कॉर्निआ’ देखील इतर रुग्णांसाठी दान करण्यात आले. ‘जेव्हा मेंदू मृत रुग्णाच्या अवयवदानासाठी नातेवाईक परवानगी देतात, तेव्हा प्रथम रुग्णालयातर्फे ‘झेडटीसीसी’ला (झोनल ऑर्गन ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर) कळवले जाते.

‘रुबी’त हृदय प्रत्यारोपण होत असले तरी हृदय प्रत्यारोपण करण्यापूर्वी रुग्णाला काही विशिष्ट औषधे व लसी देऊन साधारणत: एक महिना थांबावे लागते. त्या दृष्टीने पुण्यात आत्ता येथे रुग्ण हृदय प्रत्यारोपणासाठी तयार नव्हते. अशा वेळी जवळच्या हृदय प्रत्यारोपण केंद्रांमध्ये व राज्यात रुग्णांची उपलब्धता पाहिली जाते. त्यानंतर पश्चिम विभागात आणि नंतर ‘नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’द्वारे (नोटो) देशात हृदय प्रत्यारोपणासाठी थांबलेल्या रुग्णांचा विचार केला जातो,’ असे ‘रुबी’तील अवयवदान समन्वयक सुरेखा जोशी यांनी सांगितले.