शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तीन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघाजणांना प्रत्येकी दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांनी मंगळवारी सुनावली. चौघा आरोपींनी फिर्यादींना प्रत्येकी २५ लाख नुकसान भरपाई द्यावी, असे न्यायालयाने आदेश दिले आहेत.
आशिष विलास पुंडलिक (वय ३८), विलास सदाशिव पुंडलिक (वय ६९), वैशाली विलास पुंडलिक (वय ६२) आणि पूनम आशिष पुंडलिक (वय ३३, सर्व रा. तेजस बंगला, दीपलक्ष्मी सोसायटी, सहकारनगर क्रमांक दोन) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. मेधा मयूर नाईक (रा. रोझ परेड सोसायटी, साळुंके विहार, वानवडी) यांनी या संदर्भात न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांना तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. गौरी लकडे आणि अ‍ॅड. अशोक जाधव यांनी बाजू मांडली.
आरोपी आशिष हा अरिहंत कॅपिटल लि. या कंपनीचा सबब्रोकर म्हणून काम करत होता. त्याची मेधा नाईक आणि त्यांचे पती मयूर यांच्याशी ओळख झाली होती. शेअरबाजारात गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष आशिष याने त्यांना दाखविले. त्यांच्याकडून रोख, धनादेशाद्वारे एक कोटी ८० लाख रुपये उकळले. ही रक्कम आशिष याने आई, वडील आणि पत्नीच्या नावाने गुंतवली. सन २००७ ते २०११ दरम्यान ही घटना घडली. दरम्यान दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी आणि फिर्यादी नाईक यांच्यात समेट झाला. तेव्हा आरोपी आशिष याने तीन कोटी रुपये देण्याचे मान्य केले. ही रक्कम वीस लाख रुपये हप्त्याने देण्याचे मान्य केले. मात्र, आरोपींनी परस्पर त्यांचे घर विकले आणि परतावा देण्यास टाळाटाळ केली.
फिर्यादी मेधा नाईक यांनी स्वकष्टातून ही रक्कम जमा केली होती. आरोपींनी त्यांची फसवणूक केली. एकंदरच त्यांना फसवण्याचा आरोपींचा हेतू स्पष्ट होतो. त्यामुळे आरोपींना केवळ शिक्षा देता कामा नये, तर त्यांच्याकडून दंड आणि नुकसान भरपाई घेण्यात यावी, असा युक्तिवाद अ‍ॅड. गौरी लकडे यांनी केला. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य़ धरून आरोपींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली तसेच आरोपींनी प्रत्येकी पंचवीस लाख रुपये फिर्यादी मेधा नाईक यांना द्यावेत, असेही आदेशात न्यायालयाने स्पष्ट केले.

Story img Loader