पुणे : ‘समृद्ध परंपरेचा समाजाला विसर पडतो आहे. आपल्या सौंदर्यदृष्टीमध्ये बिघाड झाला आहे का? नवे काही तरी ओरबडून परंपरेशी जोडण्याची सवय थांबवायला हवी. थोडा संयम ठेवून सौंदर्याचा विचार करायला हवा,’ असे मत प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी बुधवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘कृष्ण मुकुंद’ पुरस्कार यंदा वस्त्ररचनाकार विनय नारकर यांना ‘वस्त्रगाथा’ या पुस्तकासाठी देण्यात आला. चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पुरस्काराचे देणगीदार डॉ. नलिनी गुजराथी आणि मोहन गुजराथी, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होते. डॉ. वर्षा तोडमल यांनी पुरस्कार निवडीचे काम केले.
कुलकर्णी म्हणाले, ‘भारतीय वस्त्र परंपरा ही खूप दीर्घ आणि समृद्ध आहे. पैठणीच्या कापडापासून उषांचे कव्हर आणि पडदे व्हायला लागलेत. आपली सौंदर्यदृष्टी बदललेली दिसते. त्यात बिघाड झाला आहे का? असा प्रश्न पडतो आहे. नवे काही तरी ओरबाडून परंपरेशी जोडण्यातच समाजाला प्रतिष्ठा वाटते आहे का, हे तपासून पहायला हवे.’
प्रा. जोशी म्हणाले, ‘संस्कृती ही काळाच्या पत्रातून प्रवाहित होत असते. व्यक्ती आणि समाजाच्या सजीव संबंधातून ती वाहत असते. संस्कृतीप्रमाणे संशोधनातही एकारलेपणा चालत नाही. वस्त्र आणि मानवी जीवन यांचा जवळचा संबंध आहे. वस्त्र संस्कृतीबाबत पहिल्यापासूनच माणसाला उत्सुकता असल्याचे दिसते.’डॉ. नलिनी गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले. सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक, तर मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
उत्सुकतेतून संशोधनाची सुरुवात झाली. इथल्या संत, पंत, तंत आणि लोकसाहित्यातही वस्त्रांचे सौंदर्य उलगडणारी मोठी परंपरा आहे. गावोगावी मिळणारे वस्त्रांचे संदर्भ आणि धागे-दोरे, अनेक प्रथा, रूढी-परंपरा आणि वस्त्र परंपरेतील नवे-जुने शब्द पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरीत होतील.- विनय नारकर, लेखक-वस्त्ररचनाकार