पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईसह कोकण विभागात आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ात पाऊस झाला. पावसामुळे काढणीला आलेले पीक धोक्यात आले असून, पावसाळी वातावरणामुळे द्राक्ष, स्ट्रॉबेरी, आंबा-काजू शेतकरी हवालदिल झाला आहे.

अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवडय़ात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आणि आकाश अंशत: ढगाळ झाले. या काळात कोकणात काही भागांत पाऊस झाला. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे पावसाळी स्थिती दूर झाली नाही. आता पूर्व-मध्य अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ते महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. त्यामुळे राज्यात आणखी चार ते पाच दिवस पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीने हुलकावणी दिली असून, पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

कोकण विभागात दक्षिण भागात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे पुढील दोन दिवस राज्याच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग प्रतितास ५० किलोमीटर असणार आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पुढील पाच दिवस काही भागांत विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. मराठवाडय़ात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहणार आहे. विदर्भातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

रात्रीच्या उकाडय़ात वाढ

राज्यात पावसाळी वातावरण निर्माण होण्यापूर्वी सर्वत्र रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन हलकी थंडी अवतरली होती. मात्र, वातावरण ढगाळ होताच तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली. सध्या सर्वच भागांत किमान तापमान सरासरीच्या पुढे गेल्याने रात्री काहीसा उकाडा जाणवतो आहे. पश्चिम महाराष्ट्रातील किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बत ५ ते ९ अंश सेल्सिअसने वाढले आहे. कोकण विभागात ते २ -४ अंशांनी अधिक आहे. मराठवाडय़ात सरासरीच्या तुलनेत किमान तापमान ६ ते ७ अंशांनी, तर विदर्भात ३ ते ६ अंशांनी अधिक आहे.

पाऊसभान..

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे परिसरात एक-दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतही पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. नंदूरबार, धुळे जिल्ह्यातील काही भागांत पाऊस होईल. मराठवाडय़ातील बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.