आठ महिन्याच्या पोटच्या लेकीला  धरणात फेकून स्वत: आत्महत्या केल्याची घटना खडकवासला धरणाजवळ घडली. सुनील विजय दनाने (३२) असे मृत व्यक्तिचे नाव आहे. त्याचा मृतदेह सापडला असून मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सुनील पत्नी आणि त्यांच्या आठ महिन्यांच्या मुलीसह खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या पिकनिक स्पॉटवर सोमवारी सायंकाळी फिरायला आला होता. यावेळी त्याने पत्नीकडून मुलीला हिसकावून घेत तिला पाण्यात फेकून दिले. त्यानंतर स्वत: देखील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली.

प्रत्यक्ष दर्शीनी आग्निशामक दलास दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरण परिसरात सुनील विजय दणाणे हे पत्नी आणि त्यांची आठ महिन्यांची मुलगी सोबत सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास आला होता.  धरणातून पाणी सोडलेल्या ठिकाणी  गेल्यावर सुनील याने पत्नीकडून बाळाला हिसकावून घेतले. काही समजण्यापूर्वीच त्यांनी त्या बाळास पाण्यात फेकून दिले. तसेच स्वत: देखील पाण्यात उडी मारली. सुनीलच्या या कृत्यानंतर पत्नी बेशुध्द पडली. त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तसेच अग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. आग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून रात्री उशीरापर्यंत शोध घेतला. मात्र तपास न लागल्याने शोध कार्य थांबवण्यात आले. मंगळवारी सुनील याचा मृतदेह सापडला. सुनील याने मद्यप्राशन केले होते. नशेमध्ये त्याने हे कृत्य केल्याची चर्चा आहे.