पुणे : लहान मुलांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या आता वाढू लागली आहे. तसेच ती फक्त यकृतापुरती मर्यादित समस्या नाही. मात्र, आश्वासक बाब म्हणजे याचे लवकर निदान केल्यास ही समस्या बरी होऊ शकते. जागतिक यकृत दिनानिमित्त १९ एप्रिलला सर्व वयोगटातील आणि खास करून लहान मुलांमधील फॅटी लिव्हरच्या समस्येबाबत जागृती करणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. कारण त्याचा दूरगामी विपरीत परिणाम मुलांच्या पुढच्या आयुष्यावर होऊ शकतो.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील पोटविकारतज्ज्ञ (गॅस्ट्रोइंटेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि जीआय एंडोस्कोपिस्ट) डॉ.प्रमोद कटारे म्हणाले की,लहान मुलांमध्ये फॅटी लिव्हरचे प्रमाण हे लक्षणीयरित्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. या अवस्थेला मेटाबोलिक डिसफंक्शन असोसिएटेड स्टिएटॉटिक लिव्हर डिसीज (एमएएसएलडी) असे म्हणतात. मात्र ही अवस्था फक्त प्रौढांमध्येच नव्हे तर अगदी १० वर्षाच्या लहान मुलांमध्ये देखील आता दिसू लागली आहे.
लहान मुलांमधील फॅटी लिव्हर हे केवळ यकृताशी निगडीत समस्या नसून चयापचयाशी निगडित समस्या होऊ लागते. यामुळे टाईप २ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि भविष्यात हृदयाच्या समस्या निर्माण होण्याच्या दृष्टीने जोखीमकारक ठरू शकते. हाडांची घनता आणि त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
मात्र पालकांसाठी यातील आश्वासक बाब ही आहे की, लवकर निदान झाल्यास फॅटी लिव्हरची समस्या बरी होऊ शकते. शारीरिक हालचाल,सक्रीय जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल हे यकृतामध्ये साठलेली चरबी कमी करू शकते. लवकर निदानासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट किंवा फायब्रो स्कॅनचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात, असे डॉ. कटारे यांनी सांगितले.
आहारासह बैठी जीवनशैली कारणीभूत
जागतिक पातळीवर लहान मुलांमधील स्थूलता ही समस्या लक्षणीयरित्या वाढत असून फॅटी लिव्हरसाठी हे मुख्य कारण ठरत आहे. त्याचबरोबर अनुवंशिकता, अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्यपदार्थ हे देखील जोखीमकारक आहेत. अशा खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लठ्ठ न दिसणाऱ्या मुलांच्या यकृतामध्ये देखील चरबी साठण्यास सुरूवात होते, याला लिन – एनएएसएच असे म्हणतात.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, लहान मुलांमध्ये मैदानी खेळांऐवजी वाढत चाललेली बैठी जीवनशैली, लठ्ठपणा यामुळे फॅटी लिव्हरची जोखीम वाढत आहे. जीवनशैली न बदलल्यास कालांतराने गुंतागुंत सुरू होऊन यकृत निकामी होण्याच्या दिशेने वाटचाल होऊ शकते.
