पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात ८४९ अन्न आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये त्रुटी आढळलेल्या ४४० आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली. १ ते २३ सप्टेंबर या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये पुणे विभागात ८४९ आस्थापनांची तपासणी झाली. गंभीर त्रुटी आढळलेल्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. पुणे विभागात अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या कलम ६९ नुसार १७६ प्रकरणे दाखल करण्यात आली असून, त्यापैकी १६० प्रकरणे निकाली काढण्यात आली. या कारवाईत १८.४३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. सर्वाधिक सुधारणा नोटीसा राज्यात पुणे विभागाला पाठवण्यात आल्या. तसेच, राज्यातील सर्वाधिक म्हणजे १६० प्रकरणे पुणे विभागाची निकाली काढण्यात आली.
कोकण खालोखाल राज्यात पुणे विभागातून अन्न नमुने गोळा करण्यात आले. या कालावधीत पुणे विभागातून विविध अन्नपदार्थांचे ६७२ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यामध्ये मिठाई, खवा, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल तसेच उपवासाच्या पदार्थांचा समावेश आहे. भेसळीच्या संशयावरून पुणे विभागात ४६ हजार २६६.०२ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. या जप्त साठ्याची किंमत सुमारे १ कोटी ५२ लाख २४ हजार रुपये आहे.
पुणे विभागातील कारवाई
८४९ — अन्न आस्थापनांची तपासणी
४४० — सुधारणा नोटिसा
६९ — परवाने निलंबित
१६० — प्रकरणे निकाली
१८.४३ लाख रुपये — दंड वसूल
६७२ – अन्न नमुने विश्लेषणासाठी
४६,२६६.०२ किलो – संशयित अन्नसाठा जप्त
