पुणे : बर्गरच्या चवीपेक्षा आता स्वच्छतेचा ‘निकष’ महत्त्वाचा ठरणार आहे! पुण्यातील कॅम्प मधील ईस्ट स्ट्रीटवरील बर्गर किंगवर अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाने कारवाई केली. गेल्या अनेक वर्षांपासून कॅम्प मधील बर्गर किंग हा तरुणाईचा अड्डा समजला जातो. ईस्ट स्ट्रीटवरील बर्गर किंग हे मोक्याच्या ठिकाणी असलेले साखळी रेस्टॉरंट आहे. यामध्ये अस्वच्छता, अन्नाचा दर्जा याविषयी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी बर्गर किंग रेस्टॉरंट मध्ये जाऊन पाहणी केली. यामध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे त्यांनी कारवाईचा बडगा उगारला.
बर्गर किंग सह पुणे विभागातील हॉटेल-रेस्टॉरंट, ई-कॉमर्स आणि डेअरी आस्थापनांच्या तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तब्बल १६ आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी तात्काळ निलंबित केली आहे. ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ११ ते १४ ऑगस्टदरम्यान ही धडक कारवाई करण्यात आली.
या विशेष मोहिमेत हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स आणि डेअरी आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अस्वच्छता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित आस्थापनांवर परवाना अथवा नोंदणी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
पुण्यातील ईस्ट स्ट्रीट, सोलापूर बाजार कॅम्प येथील बर्गर किंगचा या कारवाईत समावेश आहे. त्याचबरोबर लोणावळ्यातील हॉटेल सयाजीअंतर्गत फॉर्च्युन एंटरप्रायझेस, लोहेगावमधील हॉटेल चुल मटण, भोसरीतील सिम्पली साऊथ, कोल्हापुरातील हॉटेल पवन आणि सांगलीतील राजेश चायनीज या हॉटेल-रेस्टॉरंटवरही कारवाई करण्यात आली. पुण्यातील जेबीएम हॉस्पिटॅलिटीच्या कॅन्टीनला परवाना नसल्याने व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय सातारा जिल्ह्यातील कराड येथील डॉमिनोज पिझ्झा आणि पिझ्झा हट यांचाही कारवाई झालेल्या आस्थापनांमध्ये समावेश आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील झेप्टो लिमिटेड, स्विन्स्टा ईएनटी प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्लिंक कॉमर्सच्या दोन आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. डेअरी व्यवसायातील ओम साई राम मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, धर्मनाथ दूध शीतकरण केंद्र आणि आर. के. मिल्क यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
दरम्यान, शाळांपासून ५० मीटर परिसरात हाय फॅट, हाय शुगर आणि हाय सॉल्ट (HFSS) पदार्थांची विक्री करण्यास प्रतिबंध असून, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवरही कारवाई करण्याचा इशारा एफडीएने दिला आहे. पालकांकडून किंवा नागरिकांकडून अशा प्रकारच्या विक्रीबाबत तक्रार आल्यास प्रशासनाच्या टोल-फ्री क्रमांकावर माहिती देता येणार आहे.
एफडीएच्या या कारवाईमुळे मोठ्या ब्रँडच्या आस्थापनांनाही स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि नियमांचे पालन याबाबत कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
