पुणे: उत्सवाच्या काळात खाद्यपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात विशेष मोहीम तीव्र केली आहे. या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील दोन स्वतंत्र अन्न आस्थापनांवर अचानक छापा टाकून मोठ्या प्रमाणावर निकृष्ट आणि संशयास्पद दुग्धजन्य साठा ताब्यात घेण्यात आला.

या कारवाईत एका आस्थापनेतून सुमारे १,५१९ किलो वजनाचे दूध, बटर आणि स्किम्ड मिल्क पावडर जप्त करण्यात आली. त्याच वेळी दुसऱ्या आस्थापनेवर छापा टाकून ४९ किलो खवा, १०४ किलो पनीर आणि ११ किलो तूप असा एकूण १६४ किलो संशयित साठा जप्त करण्यात आला. सणासुदीत होणारी अन्नाची भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. ही कारवाई दौंड, मार्केट यार्ड परिसरातील आस्थापनांवर करण्यात आली. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने ११ सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातील पाटस (ता. दौंड) येथील एका आस्थापनेवर छापा टाकला. या मोहिमेत ८ लाख ५० हजार ७०२ रुपये मूल्याचा १,५१९ किलोचा म्हशीचे बटर व स्किम्ड मिल्क पावडरचा साठा जप्त करण्यात आला. वेष्टनावरील माहितीतील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे. १३ सप्टेंबर रोजी मंचर (ता. आंबेगाव) येथे दुसरी कारवाई करण्यात आली.

तिथे १३,७२० रुपयांचा ४९ किलो खवा, ३१,२०० रुपयांचे १०४ किलो पनीर आणि ७,९२० रुपयांचे ११ किलो तूप असा संपूर्ण दुग्धजन्य साठा हलक्या दर्जाचा असल्याचे आढळल्याने अधिकाऱ्यांनी तो ताब्यात घेऊन रीतसर कारवाई सुरू केली आहे.

१२ सप्टेंबरला पुण्यातील मार्केट यार्डमधील दुकानात अन्नाची मुदत संपलेले पदार्थ मिळण्यासोबतच सुरक्षेचे अनेक नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आल्याने प्रशासनाने या आस्थापनेचा परवाना रद्द केला आहे. यापुढेही जे नियमांची पायमल्ली करतील, त्यांच्यावर कडक पावले उचलली जातील, असा स्पष्ट इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.