पुणे : राज्यात सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ विशेष मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि डेअरींची धडक तपासणी करून मोठी कारवाई केली. तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने १० आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशांनुसार, १६ आणि १७ जुलै रोजी पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि डेअरींची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच मानक कार्यपद्धतींचे पालन न केल्याचे निदर्शनास आले. यामुळे संबंधित आस्थापनांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली.
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये पुण्यातील स्टार केटरिंग सर्व्हिसेस (मंगळवार पेठ), अशोक बार अँड रेस्टॉरंट (सोमवार पेठ), गोल्डन मॅजेस्टिक बेकरी (येवलेवाडी), गोल्डन बेकरी (कोंढवा), विकिंग बिर्याणी एलएलपी (बाणेर), सिद्धार्थ ॲग्रो डेअरी (आंबेगाव) यांचा समावेश आहे. याशिवाय सांगलीतील हल्द भवन कँटीन, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सह्याद्री रेस्टॉरंट अँड ढाबा व सीएनजी रेस्टॉरंट तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी येथील व्हीबीजीवायओआर शाळेचे कँटीन यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि डेअरी चालकांना अन्न सुरक्षा कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांना मोफत व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ विक्रीस ठेवणे, वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळणे, आवश्यक परवान्याशिवाय व्यवसाय न करणे; तसेच मेन्यू कार्डवर दिशाभूल करणारी माहिती न देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
ग्राहकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा स्वच्छतेबाबत तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल-फ्री क्रमांक १८००२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या नियमभंगाविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
