पुणे : राज्यभर सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन आणि डेअरी आस्थापनांवर मोठी कारवाई करून १२ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. तपासणीदरम्यान स्वयंपाकगृहातील अस्वच्छता, अन्न साठवणुकीतील त्रुटी आणि अन्न सुरक्षा व मानके नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. यात पुण्यातील जोकर हॉस्पिटॅलिटी (बालेवाडी) आणि रेड अँड ह्यूज (कल्याणीनगर) या नामांकित आस्थापनांचाही समावेश आहे.
पुणे विभागात १६ ते २० जुलैदरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत स्टार केटरिंग सर्व्हिस (मंगळवार पेठ), अशोक बार अँड रेस्टॉरंट (सोमवार पेठ), गोल्डन मॅजेस्टिक बेकरी (येवलेवाडी), गोल्डन बेकरी (कोंढवा), सिद्धार्थ ॲग्रो डेअरी (आंबेगाव), बिकांगे बियाणी एलएलपी (बाणेर), जोकर हॉस्पिटॅलिटी (बालेवाडी) आणि रेड अँड ह्यूज (कल्याणीनगर) या पुण्यातील आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सह्याद्री रेस्टॉरंट अँड ढाबा व सिगडी रेस्टॉरंट, सांगलीतील हल्दी भवन कॅन्टीन तसेच कोल्हापूरमधील VBGYOR शाळा कॅन्टीन यांचेही परवाने निलंबित करण्यात आले.
तपासणीदरम्यान बहुतांश ठिकाणी अन्न सुरक्षा व मानके (परवाना व नोंदणी) नियमावली, २०११ मधील अनुसूची-४ अंतर्गत स्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. विशेषतः स्वयंपाकगृह आणि अन्न साठवणूक विभागात अस्वच्छता, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे आणि अन्न हाताळणीतील त्रुटी आढळल्याने संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्रातही परवाने निलंबित, अन्नसाठा जप्त
राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत पुण्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतही अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. महाबळेश्वर येथील सह्याद्री रेस्टॉरंट अँड ढाबा* आणि सिगडी रेस्टॉरंट, सांगलीतील हलदी भवन कॅन्टीन तसेच कोल्हापूरमधील विभ्योर शाळा कॅन्टीन येथे स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले. तपासणीदरम्यान स्वयंपाकगृह आणि अन्नसाठवणूक परिसरातील गंभीर स्वच्छतेच्या त्रुटी निदर्शनास आल्या.
याशिवाय, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सत्यवेल ॲग्रोटेक प्रा. लि. येथे पॅकेज्ड पिण्याचे पाणी व मँगो ज्यूस असे १,३८४ किलो अन्नपदार्थ (किंमत रुपये ५३,२४०) जप्त करण्यात आले असून लेबलिंगमधील त्रुटी, निकृष्ट अथवा असुरक्षित असल्याचा संशय आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन आढळल्याने परवाना निलंबित करण्यात आला. तर कोल्हापूरमधील वेदक्रांती हेल्थ केअर येथे परवान्याविना अन्न व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाल्याने विविध आरोग्यपूरक उत्पादनांच्या १३४ बाटल्या (किंमत रुपये २.३४ लाख) जप्त करून संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
राज्यभराच्या मोहिमेत एकूण १०३ हॉटेल, रेस्टॉरंट व धाब्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३४ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर १६ अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
