पुणे ; आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई केली असून, राज्यात १० उत्पादक संस्थांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले आहेत. त्यापैकी तीन संस्था पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे शहर आणि जेजुरी एमआयडीसी, पुरंदर आहेत.
राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या व्यापक तपासणी मोहिमेत एकूण ४३४ उत्पादक संस्थांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी नियमांचे पालन न करणाऱ्या १३५ संस्थांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या. तपासणीत गंभीर उल्लंघन आढळलेल्या दहा संस्थांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. या संस्थांमध्ये आयुर्वेदिक उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या जीएमपी तसेच औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० आणि संबंधी नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे तपासणीत आढळले. या त्रुटींमध्ये प्रामुख्याने मान्यताप्राप्त तांत्रिक व्यक्तींची अनुपस्थिती, सक्षम तांत्रिक व्यक्ती नसताना उत्पादन करणे, गुणवत्ता नियंत्रण विभाग कार्यरत नसणे, उत्पादन व चाचणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध नसणे आणि अस्वच्छ उत्पादन परिसर यांचा समावेश आहे. तसेच, बॅच उत्पादनाच्या नोंदी आणि कच्च्या मालाच्या नोंदींमध्ये तफावत, औषधांच्या लेबलवर चुकीची उत्पादन तारीख, कच्च्या मालाची व तयार उत्पादनाची चाचणी उपलब्ध नसणे, कच्च्या मालाच्या नोंदींचा अभाव, मंजूर नकाशानुसार उत्पादन संस्था नसणे, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षणाच्या नोंदी नसणे, नियंत्रित नमुने उपलब्ध नसणे, अशा त्रुटीही आढळल्या.
आयुर्वेदिक औषध उत्पादकांसाठी शेड्यूल टीअंतर्गत नमूद केलेल्या चांगल्या उत्पादन पद्धतींचे काटेकोर पालन बंधनकारक आहे. नागरिकांपर्यंत पोहोचणाऱ्या औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी नियमांचे पालन आवश्यक असल्याचे ‘एफडीए’ने स्पष्ट केले आहे.
पुण्यातील तीन संस्था कोणत्या?
औषधांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता
औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तपासणीत आढळलेल्या त्रुटी गंभीर असल्याचे ‘एफडीए’ने स्पष्ट केले आहे. विशेषतः औषधे परस्पर दूषित होऊ नयेत, यासाठी आवश्यक कार्यपद्धती उपलब्ध नसणे ही गंभीर बाब मानण्यात आली आहे. त्यामुळे परवाना प्राधिकरणाने संबंधित दहा संस्थांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
पुढील कारवाईकडे लक्ष
दरम्यान, राज्यातील १३५ आयुर्वेदिक उत्पादक संस्थांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडून तपासणीतील त्रुटींवर स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इतर आयुर्वेदिक उत्पादक संस्थांवरही पुढील काळात कारवाई होते का, याकडे लक्ष लागले आहे.
