पुणे : नावामध्ये साधर्म्य ठेवून वेगवेगळ्या औषध घटकांची विक्री करणे आणि नियमांचे उल्लंघन करणे एका बड्या औषध कंपनीला महागात पडले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या कंपनीच्या पुणे, नागपूर आणि ठाणे येथील ‘सीएफए’ गोदामांचे औषध विक्री व वितरण परवाने रद्द केले आहेत. ‘एफडीए’ने मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

पत्रकात म्हटले आहे, ‘कंपनीकडून एका प्रस्थापित ब्रँडच्या नावाखाली दोन वेगळे औषध घटक बाजारात विकले जात असल्याचे ‘एफडीए’च्या तपासणीत समोर आले. मूळ औषधात फक्त ‘प्लस’ हे चिन्ह जोडून मूळ औषध घटकच पूर्ण बदलण्यात आला होता. यामुळे रुग्णांना भलतेच औषध मिळण्याचा आणि आरोग्याला धोका निर्माण झाला होता. जुलै २०२६ मध्ये भिवंडी (ठाणे), वडकी (पुणे) आणि निमजी (नागपूर) येथील गोदामांवर छापे टाकून औषधांचा साठा जप्त करण्यात आला. कंपनीने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कंपनीला सुनावणीची संधी देण्यात आली, मात्र त्यांचा खुलासा अस समाधानकारक आढळल्याने ‘एफडीए’ने परवाने रद्द करण्याचा सकारण आदेश जारी केला.एफडीए’ने औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम १९४५ अन्वये परवाने रद्द केले.

वेगवेगळे घटक असलेल्या औषधांचे ब्रँड नाव संभ्रम निर्माण करणारे नसावे. नियमांमध्ये औषधांची सुरक्षितता, गुणवत्ता यांच्याबरोबरीनेच औषधांचा सुरक्षित व अचूक वापर सुनिश्चित करणे ही उत्पादकांची जबाबदारी आहे. नागरिकांनी औषध घेताना लेबलवरील जेनेरिक नाव आणि मात्रादेखील तपासावी. असे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

तपासणीत गंभीर त्रुटी समोर

  • विक्रेत्यांनी ‘ज्या औषधांची मागणी केली असताना त्यांना ‘वेगळ्याच औषधांचा पुरवठा केला
  • गुजरातच्या अन्न व औषध नियंत्रण प्रशासनाने या औषधांचे उत्पादन परवाने २ जूनला रद्द केले
  • कंपनीने ही बाब महाराष्ट्र ‘एफडीए’पासून लपवून ठेवली आणि विक्री सुरूच ठेवल्याचे समोर आले
  • गोदामांमध्ये तपासणी पुस्तिका नसणे आणि सक्षम व्यक्तीच्या अनुपस्थितीत विक्री केल्याचे आढळले