‘एफडीए’कडून शहरातील मिठाई विक्री दुकानात तपासणी

पुणे : गणेशोत्सवात खव्यापासून तयार करण्यात येणाऱ्या मोदक आणि पेढय़ांच्या मागणीत मोठी वाढ होते. मागणी पूर्ण करण्यासाठी निकृष्ट प्रतीच्या भेसळयुक्त खव्याचा वापर पेढे आणि मोदक तयार करण्यासाठी होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यापाश्र्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) मिठाई विक्री दुकानातील मिठाईचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. तपासणी मोहिमेसाठी ‘एफडीए’तील १८ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी गणेशोत्सवावर करोनाचे सावट आहे. सार्वजनिक मंडळांकडून साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येत आहे. सार्वजनिक मंडळाच्या परिसरात तात्पुरती दुकाने थाटून पेढे, खव्याचे मोदकांची विक्री तयार केली जाते. यंदा तात्पुरत्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही. उत्सवाच्या कालावधीत घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांकडून मिठाईला मागणी वाढते. भेसळीच्या घटना रोखण्यासाठी गणेशोत्सवातील दहा दिवस मिठाई विक्रेत्यांकडून तयार करण्यात आलेले पेढे, मोदकांची तपासणी करण्यात येणार आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन ‘एफडीए’ची पथके मिठाई विक्रेत्यांकडे तपासणी करणार असून मिठाईचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘एफडीए’तील अधिकाऱ्यांनी दिली.

उत्सवाच्या कालावधीत मिठाईला विशेषत: खव्यापासून तयार करण्यात आलेले मोदक आणि पेढय़ांना मोठी मागणी असते. मागणीमुळे मोठय़ा प्रमाणावर मिठाई विक्रीसाठी आणली जाते. मिठाई तयार करताना अन्न सुरक्षेच्या नियमांकडे काणाडोळा तसेच भेसळयुक्त खव्याचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.

तक्रारीसाठी दूरध्वनी क्रमांक

उत्सवाच्या कालावधीत काही गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी कराव्यात. दोन वर्षांपूर्वी ‘एफडीए’च्या पथकाने गणेशोत्सवाच्या कालावधीत ४० लाख रुपयांचा भेसळयुक्त खवा जप्त केला होता.

गणेशोत्सवाच्या कालावधीत मिठाई विक्रेत्यांची  ‘एफडीए’च्या पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. शहर आणि उपनगरातील मिठाई विक्रीच्या दुकानात जाऊन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पथके तपासणी करणार आहेत.

– सुरेश देशमुख, सहआयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए)