पुणे : ओैषध निर्मिती कंपनीच्या नावे बनावट ओैषधांची विक्री केल्या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पुण्यातील सदाशिव पेठ, तसेच मुंबई, नागपूर, रायगड येथील पाच ओैषध वितरकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाने (एफडीए) केलेल्या तपासात ही बाब उघडकीस आली आहे.
याबाबत ‘एफडीए’तील औषध निरीक्षक श्रुतिका जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ‘एफडीए’च्या पथकाने २८ जुलै २०२५ रोजी सदाशिव पेठ येथील एका वितरकाची तपासणी केली. तेथून ॲल्बुरेल आणि रिच्यूएक्सरेल या औषधांचे नमुने घेऊन ते शासकीय विश्लेषक, मुंबई कार्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले.
शासकीय विश्लेषकांच्या अहवालानुसार ॲल्बुरेल या ओैषधाच्या चाचणीत दोष आढळले आहे. त्यानंतर औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या कलम १७ (ब) अन्वये संबंधित ओैषधाचे नमुने बनावट घोषित करण्यात आले आहे. तपासादरम्यान या बनावट औषधाची खरेदी आणि विक्री व्यवहारात पुण्यातील सदाशिव पेठ, नागपूर, मुंबईतील दादर, शीव, तसेच रायगडमधील कामोठे येथीलवितरकांनी संगनमत करून बनावट औषधांची खरेदी आणि विक्री केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बनावट औषधावर उत्पादक म्हणून नमूद असलेल्या रिलायन्स लाईफ सायन्स प्रा. लि.(नाशिक) यांनी लेखी पत्राद्वारे संबंधित ‘बॅच’चे उत्पादन त्यांनी केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे औषध पूर्णतः बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित एका ओैषध निर्मिती कंपनीच्या प्रमुखाविरुद्ध यापूर्वीही बनावट औषध विक्री प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.
रुग्णांच्या जिवाशी खेळ
वैद्यकीय उपचारांमध्ये वापरले जाणारे ॲल्ब्युरेल हे महत्त्वाचे औषध आहे. बनावट स्वरूपात या ओषधाची विक्री करणे ही गंभीर बाब आहे. एकप्रकारे हा रुग्णांच्या जिवाशी खेळ आहे. शासनाचीही आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरातील औषध विक्रेत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद औषधांची माहिती त्वरीत प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे औषध यकृत, तसेच अन्य गंभीर आजारांसाठी वापरले जाते असल्याची माहिती देण्यात आली आहे.
