पुणे : खाद्यपदार्थ आकर्षक दिसावेत म्हणून ‘सिंथेटिक’ खाद्यरंगांचा वापर करणे किंवा ज्या खाद्यरंगांना मान्यता आहे, त्या रंगांचाही निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक वापर करणे व्यावसायिकांना आता महागात पडेल. अन्न व औषध प्रशासनाने याबाबत नियमावली तयार केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, मिठाई आणि फरसाण उत्पादकांचा परवाना किंवा नोंदणी तत्काळ निलंबित करण्याचा इशारा ‘एफडीए’ने दिला आहे.

खाद्यपदार्थ विकणाऱ्या आस्थापनांनी संबंधित पदार्थासाठी परवानगी असलेले खाद्यरंगच वापरणे आवश्यक आहे. मिठाई आणि फरसाण उत्पादकांना वापरल्या जाणाऱ्या रंगाचे अचूक नाव, प्रकार, संबंधित पदार्थासाठी त्याची परवानगी आणि वापराची कमाल मर्यादा यांची माहिती ठेवणे बंधनकारक आहे. केवळ मान्यताप्राप्त खाद्यरंग वापरत असल्याचे सांगून जबाबदारी टाळता येणार नाही. रंगाची ओळख, वापराचे प्रमाण आणि नियमांनुसार त्याचा वापर होत असल्याचे उत्पादकांना सिद्ध करता आले पाहिजे, असे ‘एफडीए’ने स्पष्ट केले आहे. चव आणि दिसण्यापेक्षा ग्राहकांचे आरोग्य महत्त्वाचे असून, खाद्यपदार्थ आकर्षक बनविण्यासाठी अन्नसुरक्षेशी तडजोड करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, ‘एफडीए’ प्रशासनाने लोहगाव येथील एका ढाब्याची ८ ऑक्टोबर रोजी तपासणी केली. त्या वेळी स्वच्छता आणि अन्नसुरक्षेशी संबंधित त्रुटींसह खाद्यरंगांच्या वापराबाबतही गंभीर बाबी निदर्शनास आल्या. या त्रुटींचा विचार करून संबंधित ढाब्याची नोंदणी निलंबित करण्यात आली. अन्नसुरक्षा अधिकारी प्रियंका मगर यांनी ही तपासणी केली.

रंग वापरण्यावर निर्बंध

मिठाईमध्ये एक किलोमागे केवळ शंभर ‘पीपीएम’ म्हणजेच एक मिलिग्रॅम एवढाच रंग वापरता येणार आहे. हा रंग ‘एफएसएसएआय’चा मान्यताप्राप्तच असायला हवा. बेकरी उत्पादनातील खाद्यपदार्थांसाठी रंग वापरण्यास मुभा असली, तरी कुठल्याही हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांना रंग वापरण्यावर निर्बंध आहेत. नैसर्गिक रंग वापर आणि ‘एफएसएसएआय’च्या नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती ‘एफडीए’चे पुणे विभागाचे सहआयुक्त दि. वा. भोगावडे यांनी दिली.

मिठाई, फरसाण ॲण्ड डेअरी असोसिएशन पुणे संघटनेचे सचिव अमित अग्रवाल यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की,शहरातील मिठाई, फरसाणविक्रेत्यांना वेळोवेळी बदललेल्या नियमांविषयी मार्गदर्शन करण्यात येते. या विषयी कार्यशाळाही घेण्यात येतात. अंदाजाने रंग न टाकता तो प्रमाणातच असावा, या विषयी संघटनेचे सभासद दक्ष असून, ‘एफडीए’च्या नियमांचे पालन करण्यात येते.